पथ्रोटः कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शेतकऱ्यांनी आपला बैल तोरणाखाली न नेता घरीच गोठ्यातच घाट लावून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. यंदा तरी सर्जा-राजाला उत्साहाने नवा साज, झूल घालून सन्मानपूर्वक तोरणाखाली गावपाटलाच्या हाताने बैलांना घाट लागेल या आशेवर बळिराजा होता. प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी बैलपोळा साजरा करण्यावर बंदी घातल्याने पोळा भरण्याच्या ठिकाणावर स्मशानशांतता दिसून आली. कोरोनामुळे सार्वजनिक पोळा न भरल्याने शेतकऱ्यांमध्येही निरुत्साह दिसून आला.
जिल्हाधिकारी यांनी जारी केलेला अध्यादेशाचे पत्रक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचले असता त्यांनी गावदवंडी देत पोळा भरणार नसल्याचे जाहीर केले होते. सोबत पोलीस विभागही सतर्क होता. परिणामी बैलमालकांनी आपल्या ढवळ्या-पवळ्याची घरी विधीवत पूजा करून हनुमान मंदिराच्या पाऱ्यापर्यंत नेऊन बैलजोडीसह शेतकऱ्यांनी दर्शन घेतले.
मानकऱ्यांनी घाट व बेलफुले वाहल्यावर सजवलेल्या बैलासोबत सहपरिवारांनी सेल्फी घेत बैलपोळा साजरा करण्यात धन्यता मानली. कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांनी घरीच पोळा साजरा केला असली तरी निर्बंधामुळे शासनाप्रती नाराजी व्यक्त केली.