४२ दिवस मृत्यूशी झुंज, वनअधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा अंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यरत लेखापालाची ४२ दिवसांपासून सुरू असलेली कोरोनाशी झुंज अखेर मंगळवारी संपुष्टात आली. उपचारादरम्यान त्यांची नागपूर येथे प्राण ज्योत मालवली. वनमजूर ते लेखापाल असा त्यांचा प्रवास राहिला.
मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या विभागीय कार्यालयातील लेखापाल देविदास खोटे (४७) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मदतीकरिता उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह सर्वच वनकर्मचारी एकवटले. उपचारादरम्यान अमरावती येथे प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना प्लाझ्मा मिळावा म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह कार्यरत कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मादात्यांना सोशल मीडियावरून मदत मागितली. अखेर दाता मिळाला. प्लाझ्मा दिला गेला. मात्र, प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. यात नागपूर येथील उपचाराच्या खर्चाकरिता परत कर्मचारी आणि अधिकारी मदतीला पुढे आले.
दरम्यान, ही बाब मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिनी सिंह यांचे लक्षात आली. त्यांनी लागलीच खोटे कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला व स्वतः पुढाकार घेऊन भरीव आर्थिक मदतीचा हात पुढे केला. अमरावतीपासून नागपूरपर्यंत, नागपूरपासून यवतमाळ, ठाणे, मुंबईपर्यंत सर्वांनीच यात आर्थिक मदत केली. वन्यजीव विभागाकडूनही आर्थिक मदत केली गेली आणि अल्पावधीतच जवळपास सहा लाख रुपये खोटे कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.
देविदास खोटे हे मेळघाटातील खैरकुंड येथील रहिवासी. त्यांनी वनमजूर म्हणून चिखलदरा येथे काम करण्यास सुरुवात केली होती.