अमरावती : परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात लेखापालपदी असलेल्या अश्र्विनी देशपांडे यांनी मंगळवारी चांगलाच गोंधळ घातल्याप्रकरणी बुधवारी त्यांचे निलंबन करण्यात आले. आता देशपांडे यांचे निलंबन काळात मोर्शी आरएफओ कार्यालय मुख्यालय असेल, असे आदेश अमरावतीचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांनी निर्गमित केले आहे. या प्रकारामुळे वनविभाग चांगलेच चर्चेत आले आहे.
लेखापाल अश्र्विनी देशपांडे यांनी परतवाडा येथील आरएफओ कार्यालयात विशिष्ट प्रकाराचे पेय प्राशन करून चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड हे हैराण झाले. ही महिला लेखापाल काही केल्याविना समजत नसल्याने अखेर वनविभागाने पोलिसांमार्फत वैद्यकीय तपासणी केली. यादरम्यान बेधूंद असलेल्या लेखापाल देशपांडे एका पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्यांशी हुज्जत, वाद घालत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. वनविभागातील महिला लेेखापालाच्या अशा वर्तणुकीने महिला पोलीस त्रस्त झाले होते. अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील या महिला लेखापालांचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे महिला लेखापालांच्या अशा वागणुकीबाबत वन विभागाकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी अचलपूर पोलिसांनी या महिलेविरूद्ध भादंविच्या ३२३. ५०४, ५०६, ११०, १०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------
लेखापाल ए.ए. देशपांडे यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (१) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून देशपांडे यांना यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश निर्गमित केले आहे.
- चंद्रशेखरन बाला, उपवनसंरक्षक, अमरावती