अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द या गावात भानामतीच्या संशयावरून महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. त्याअनुषंगाने ‘भानामती’ चर्चिली जात आहे. जिल्ह्यातही अलीकडे दोन घटनांमध्ये भानामतीचा दावा करण्यात आला. त्यातील एका प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. एका प्रकरणात अभा अंनिसने तो दावा सप्रमाण खोटा ठरविला. कधी पैशांचा पाऊस; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती होत असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करणी केल्याच्या वादातून मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी नोंदविल्या जातात. मात्र, त्यात केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात येतो.
भानामतीत हे घडत असल्याचा दावा
घरातील कपडे पेट घेणे, कपडे फाटणे, अन्नात विष्ठा येऊन पडणे, घरातील भांडी स्थलांतरित होणे, शरीरावर फुल्या उमटणे, अंगावर जखमा होणे, घरावर दगड पडणे, घरातून पैसे नाहीसे होणे, अंगणात वस्तू येऊन पडणे, डोळ्यातून हळदी कुंकू येऊन पडणे, तोंडातून सुया पडणे, घरातील भिंतींवर संदेश लिहिल्या जाणे, घरातीलच साहित्याने -धान्याने एखादे नाव लिहिल्या जाणे किंवा काही चिन्ह बनविले जाणे, अशा एक ना अनेक प्रकारच्या घटना भानामतीमध्ये घडत असल्याचा दावा केला जातो.
सन २०१३ मध्ये झाला कायदा
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३’, जो सामान्यत: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणून ओळखला जातो, तो राज्यात २६ ऑगस्ट २०१३ पासून अमलात आला. या कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जातात.
घटना १
अचलपूर तालुक्यातील सावळी येथील सपन हनुमान मंदिर परिसरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यासाठी एका १६ वर्षीय मुलीला भरीस घालण्यात आले. त्या प्रकरणात दहा जणांविरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाहून बाहुली, रक्ताळलेले कपडे, मिरच्या जप्त करण्यात आल्या होत्या.
घटना दुसरी
डिसेंबर २०२० मध्ये टाकरखेडा पूर्णा येथील पातालबन्सी कुटुंबीयाने त्यांच्या घरात भानामतीमुळे रहस्यमयी आग लागत असल्याचा दावा केला होता. मात्र, अभा अंनिसने तो दावा सत्यशोधनाअंती खोटा ठरविला. ती आग मानवी हस्तक्षेपामुळे लागत असल्याचा निष्कर्ष अभा अंनिसने काढला होता.