अमरावती : राज्यात दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. यंदाच्या तीन महिन्यात पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील तब्बल ४६४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. या दोन विभागात सरासरी दर पाच तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
राज्यात मराठवाड्यातील आठ, पश्चिम विदर्भातले पाच व पूर्व विदर्भातला वर्धा, असे १४ शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यामध्ये यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. त्यातुलनेत या तीन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यंदा मार्चअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात २१४ तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात २४९ असे एकूण ४६३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे.
अरावती विभागीय आयुक्तांच्या अहवालानूसार जानेवारी २००१ पासून तब्बल १९,१२७ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १०,०२० प्रकरणे अपात्र ठरली आहेत तर ८१७९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय २५० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा यवतमाळ जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.