अमरावती : महानगरातील ज्या मालमत्तांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांचे पुनर्सर्वेक्षण, वापराच्या उद्देशांमध्ये बदल, वाढीव क्षेत्रफळ व अनधिकृत बांधकाम अशा चार पातळ्यांवर सर्वेक्षण व मूल्यांकन करून कर आकारणी करण्यात येणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी आयुक्त प्रशांत रोडे यांनी आढावा घेत कार्यवाहीची दिशा स्पष्ट केली.
महापालिकेच्या हद्दीतील सर्व मालमत्तांना कर लावण्याचा संकल्प आयुक्तांनी केला आहे. वर्षभरात तिजोरीत भर घालण्यासाठी लक्ष्यपूर्तीकडे काटेकोर लक्ष दिले जाईल, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी आयोजित बैठकीत आयुक्तांनी सांगितले. बैठकीला कर मूल्यांकन निर्धारण संकलन अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, विशाखा मोटघरे, नंदकिशोर तिखिले, सहायक क्षेत्रीय अधिकारी, निरीक्षक, मालमत्ता कर वसुली लिपिक उपस्थित होते.
कोरोनाचे प्रादुर्भावामुळे लक्ष्यांकाच्या तुलनेत वसुली माघारली आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मागील वर्षीच्या तुलनेत जास्त वसुली झाली पाहिजे, असे उद्दिष्ट आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. नववर्षात सामान्यांमध्ये जनजागृती करून करवसुलीचे उद्दिष्ट गाठून महापालिकेच्या तिजोरीत भर घालण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याचे संकेत आहेत. मालमत्ताकर सर्वेक्षण व मुल्यांकनांचे अधिकार पुन्हा महापालिकेस प्राप्त झाल्याने उत्पन्नवाढीचे द्वार उघडले आहे. मालमत्ता करातून सद्यस्थितीत मिळत असलेल्या उत्पन्नात पुढील आर्थिक वर्षात मोठी वाढ अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बॉक्स
दोषी आढळल्यास कर लिपिकावर कारवाई
मालमत्ता कर इमारतीला बरोबर लागला की नाही, याची तपासणी पुढील काळात केली जाणार असून, त्यासाठी पथकाची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. या टीमद्वारे चौकशी करताना दोषी आढळल्यास संबंधित मालमत्ता कर वसुली लिपिकावर त्वरित प्रशासकीय कारवाइ करण्यात येईल. पुढील पंधरा दिवसांत प्रत्येक मालमत्ता कराच्या कक्षेत आली पाहिजे, असे आयुक्तांनी सांगितले
बॉक्स
प्रत्येक कर्मचाऱ्याला कर भरणे अनिवार्य
सर्वच मालमत्तांच्या कर पुर्ननिर्धारणाच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मालमत्ता फेरफाराची कार्यवाही लवकर झाली पाहिजे. जे वसुली लिपिक चांगले काम करतील, त्यांना पारितोषिक देण्यात येईल. महानगरपालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने व अधिकाऱ्याने मालमत्ता कर भरणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी निक्षून बजावले.
बॉक्स
वापर उद्देशात बदल झालेल्या मालमत्तांचा शोध
मनपा हद्दीतील नव्या इमारती, घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आदींकडून मालमत्ता कराची वसुली करण्यावर भर देण्यात येईल. शहरातील अनेक जुन्या मालमत्तांची पुनर्रचना झाल्यानंतरही त्यांची कोठेही नोंद नसल्याने जुन्या दराने टॅक्स वसुली केली जात आहे. अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना पुनर्रचित दराने मालमत्ता कर वसुली केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.