असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : राज्यातील महिला पोलिसांना आठ तास ड्युटी देण्याबाबतचा आदेश सरकारने काढला असून, पोलीस दलातील महिला अंमलदारांना आठ तासांच्या ड्युटीच्या निर्णयाची २७ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिला कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
महिला पोलिसांना दैनंदिन काम, गंभीर गुन्ह्याच्या तपासासंदर्भात अनेक वेळा जादा तास कार्यरत राहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा नागपूर पोलीस आयुक्तालयात महिला पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला होता. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलीस घटकांनी हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुणे ग्रामीण व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात आठ तास ड्युटीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतर शुक्रवारी सरकारने हा निर्णय राज्यातील महिला पोलिसांसाठी लागू केला आहे.
///////////
शहरातील एकूण पोलीस ठाणे : १०
एकूण पोलीस : १,७०३
महिला पोलीस : २७५
///////
आता आईसोबत रोज खेळता येणार
आई सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्यात जात होती. रात्री ९ नंतर ती घरी येत असल्याने केवळ रात्रीचे जेवणच तिच्यासोबत करण्याचे भाग्य लाभत होते. ती आता सायंकाळी ५ नंतर परत येणार, या केवळ विचाराने मी हरखलो आहे. तिच्याशी खूप गुज करायचे आहे.
- एक मुलगा, अमरावती
//////////////
आई-बाबा दोघेही पोलीस. त्यामुळे केवळ सुटीचा दिवसच आईशी हक्काने खेळता यायचे. अंमलदार असलेल्या आईच्या ड्युटीच्या वेळेत कपात झाली, ती केव्हा परतणार, हे देखील ठरले. त्यामुळे आम्हा लहानग्या भावंडांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
- एक पोलीसकन्या
////////////////
शनिवारीच आईने चार तास कपातीबाबत सांगितले अन् जाम खूष झालो. आता मम्मीला माझ्यासोबत वेळ घालवता येईल, ऑनलाईन क्लासच्या वेळी तिची सर्वाधिक गरज भासते. ती आता दुपारी २ वाजता गेल्यास त्याआधी तिची छान सोबत मिळेल.
- एक पोलीस पाल्य