लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएच.डी. नोंदणी ते पदवी (आचार्य) ही प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे. त्याकरिता नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून पीएच.डी.साठी नवसंशोधकांना विद्यापीठात येरझारा माराव्या लागणार नाहीत, अशी यंत्रणा उभी करण्यात येत आहे.उच्च पदस्थ विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. पदवी मिळविणे ही त्यांच्या शैक्षणिक जीवनात मोठी आनंदाची बाब आहे. मात्र, काही वर्षांपासून पीएच.डी. पदवीसाठी वेळकाढू धोरण असल्यामुळे नवसंशोधक विद्यार्थी त्रस्त झाले होते. यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उच्च शिक्षणाची प्रक्रिया ऑनलाईन असावी, अशा सूचना आहेत. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. पदवीचा एकूणच प्रवास हा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून ऑनलाईन कारभार सुरू होणार आहे.अशी होणार ऑनलाईन प्रक्रियापीएच.डी. प्रवेशासाठी मोबाइलवर आयडी लॉगइन क्रमांक मिळेल. पेट परीक्षेची नोंदणी करावी लागेल. संशोधन मान्यता केंद्रावर अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. रिसर्च केंद्रावर कोर्स वर्क परीक्षा घेण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांचे कोर्स वर्क, पेट परीक्षा उत्तीर्णची पडताळणी, संशोधन मान्यता केंद्रावर ऑनलाईन प्रवेश, आरआरसी केंद्रावर कागदपत्रे हे सॉफ्टवेअरद्वारे स्कॅनिंग केले जातील. विद्यार्थ्यांची कागदपत्रे ही अधिष्ठातांना ऑनलाईन बघता येतील. आरआरसीनंतर विद्यापीठाचे नोंदणी क्रमांक मिळेल. संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर समरी, प्रबंध सुद्धा ऑनलाईन सादर करावे लागेल. त्यानंतर परीक्षक प्रबंध, समरी ऑनलाईन तपासतील. पुनर्मूल्यांकन ऑनलाईन आणि पदवी ऑनलाईन मिळेल.पीएच.डी. पदवी मिळविण्यासाठी नवसंशोधकांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. नोंदणी ते पदवी हा सर्व प्रवास ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळ, श्रम वाचविण्यास मदत होईल. याद्वारे पारदर्शकतेला वाव मिळेल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ