अमरावती : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारी अथवा खासगी रुग्णालयात नॉन कोविड रुग्ण डॉक्टरांकडून बेदखल होत आहे. शहरातील काही रुग्णालयांतील डॉक्टरांनी कोविड हॉस्पिटल सुरू केल्यामुळे येथेे नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. कोरोनाची वर्षपूर्ती झाल्यानंतरही नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. पहिले लॉकडाऊन संपत नाही, तोच दुसरे लॉकडाऊन १५ एप्रिलपासून सुरू झाले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ हे तीन महिने वगळता कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कायम आहे. गत दोन दिवसांपासून ऑक्सिजन बेड मिळत नसल्याची रुग्णांच्या नातेवाईंकांची ओरड आहे. प्रसिद्ध डॉक्टरांचे दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. काही डॉक्टारांना इतर ठिकाणी कोविड रुग्णांना शिफ्ट करण्याची वेळ आली आहे. रुग्णसंख्या अधिक आणि बेड कमी, अशी स्थिती खासगी दवाखान्यांची आहे. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नागपूर येथील कोरोनाचे ७० रुग्ण उपचारार्थ पाठविण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयांचे नियोजन कोलमडले आहे. पीडीएमसी सुद्धा कोविड रुग्णांनी हॉऊसफुल्ल आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका यांना सुद्धा कोविड रुग्णसेवेसाठी कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे आपसुकच नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु, आर्थोपेडिक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती आहे.
--------------
सद्यस्थितीत नॉन कोविड रुग्ण कमी झाले, असे म्हणता येणार नाही. इर्विनचे सर्वच वाॅर्ड हाऊसफुल्ल असून, आजमितीला ८० कोविडचे, तर २० नॉन काेविडच्या रुग्णांवर उपचार केला जात आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक
----------------------------
शासन गाईडलाईननुसार तात्काळ सेवा देण्याचे निर्देश आहे. रुग्णालयात प्लांट सर्जरी बंद असून, आपत्तकालीन शस्त्रक्रिया होत आहे. जनरल सर्जनकडे कोविड हॉस्पिटल नाही. हायड्राेसिल शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. महिनाभर अशीच स्थिती असेल.
- डॉ, अनिल रोहणकर, माजी अध्यक्ष, आयएमए
-----