व्हॉटस्अप, फेसबुकवर कॅमेन्टस् : पराभव झालेल्या उमेदवारांची आगपाखडअमरावती : महापालिका निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मध्ये घोटाळा झाल्याची सोशल मीडियावर प्रचंड धूम सुरु झाली आहे. व्हॉटस्अप, फेसबूकवर वेगवेगळे कॅमेन्टस् पोस्ट होत असून भाजपने ही निवडणूक मॅनेज केली, असा आरोप केल्या जात आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्या प्रकरणी खा. आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षस्थानी रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक पार पडली.गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट बहुमत हे भाजपच्या पारड्यात गेले. शहरात सहा प्रभागात ‘कमळ’ फुलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निकालाची दिवशी देखील पराभूत उमेदवारांनी ‘ईव्हीएम’ मध्ये गडबड घोटाळा झाल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना नोंदविली आहे. गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत पराभव झालेल्या उमेदवारांचे समर्थक, मतदारांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या दिला होता. मात्र आता दोन दिवसांनंतर ‘ईव्हीएम’ घोटाळ्याची सोशल मीडियावर धूम सुरू झाली आहे. ‘कमळाबाई’ने महापालिका निवडणूक मॅनेज केली. प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून ‘ईव्हीएम’मध्ये गडबड केल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे. व्होटींग करताना ईव्हीएम मशीनवर बटन दाबताच, मतदारांना एक रिसिट आली पाहिजे, त्यावर आपले मत कोणाला जात आहे, हे दर्शविले पाहिजे. ती रिसिट मतदान केंद्रातून बाहेर येताना एका पेटीत जमा केली पाहिजे. म्हणजे मशिनवरील वोट व बंद पेटीतील मते टॅली होतील. त्यामुळे गडबड होण्याची शक्यता राहणार नाही, असे राजकीेय जाणकारांचे मत आहे. साईनगर परिसरातील रहिवासी असलेले अशोक पळवेकर यांनी ‘ईव्हीएम’चा मतदानासाठी वापर त्वरित बंद केला पाहिजे, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. पळवेकर हे इंग्रजी व मराठी विषयांचे प्राध्यापक असून त्यांच्या मते सीयूमध्ये जसे प्रोग्रामिंग सेट केलेले असेल, तसाच रिझल्ट बाहेर येईल. जसे एखादा निवडणूक क्षेत्रात ८०० मतदार आहेत आणि १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ व १० हे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. त्यापैकी पाच उमेदवारांना निवडून आणयचे असेल तर १०० पर्यंत मतदान झाल्यानंतर कोणत्याही उमेदवारांना मिळणारी मते (व्होट्स) पाच या उमेदवारांना वळती करण्याचे प्रोग्रामिंग सेट केले जाऊ शकते, ते शक्य आहे. त्यामुळे मते कुणालाही दिले तरी त्याचे 'डायव्हर्शन' पाच उमेदवारांकडे होईल आणि तोच विजयी होईल. सीयूमध्ये तसे प्रोग्रामिंग केल्यास सहज शक्य आहे. त्यामुळे प्रबळ लोकशाहीसाठी जुनीच पद्धत मतदान प्रक्रिया अवलंबविली जावी. मतपत्रिका, शिक्का याचच वापर केला जावा, तेच खात्रीलायक वृत्त असल्याचे मत अशोक पळवेकर यांनी फेसबुकवर अपलोड केले आहे. सोशल मीडियावर भाजपच्या विजयाबद्दल सुरू झालेले ‘वार’ पराभूत उमेदवार ‘कॅश’ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना दिसून येत आहेत. ‘ईव्हीएम’ घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अमरावतीत सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या बंदला किती प्रतिसाद मिळतो, याकडे नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)ईव्हीएममध्ये अजिबात घोटाळा किंवा गडबड करता येत नाही. तसे कोणीही यात काहीही करू शकत नाहीत. तथापि कोणाला शंका-कुशंका असेल तर त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून दाद मागावी. यातील सत्य का ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका.ईव्हीएम हे मानवनिर्मित यंत्र आहे. या मशिनमध्ये काय आहे, काय होऊ शकते, हे तज्ज्ञांना चांगले माहीत आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहा प्रभागांत भाजपचे चारही उमेदवार निवडून येणे, हे ‘शॉकींग’ आहे. यावर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.- प्रमोद महल्ले,काँग्रेसचे पराभूत उमेदवार, गाडगेनगर
‘ईव्हीएम’ घोटाळ्याची सोशल मीडियावर धूम
By admin | Published: February 27, 2017 12:11 AM