अमरावती : घटस्फोटीत पत्नीचे न्युड फोटो एफबीवर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी १५ मार्च रोजी रात्री महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पुर्वपतीविरूद्ध विनयभंग व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. ११ ते १५ मार्च दरम्यान ती बदनामीची मालिका चालल्याची तक्रार महिलेने नोंदविली.
यातील फिर्यादी तरूणीचे आरोपीसोबत सन २०१८ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवस सुखात गेले. मात्र, लवकरच त्यांच्यात वितुष्ट आल्याने तिने डिसेंबर २०२१ मध्ये आरोपीकडून घटस्फोट घेतला. दरम्यान आता फिर्यादीचे दुसरे लग्न जुळले आहे. जूनमध्ये ती लग्न देखील करणार आहे. दरम्यान ११ मार्च रोजी आरोपी पुर्वपतीने पुर्वपत्नीच्या भावाच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार केले. त्या एफबी अकाउंटवर मेहुण्याचा प्रोफाईल फोटो ठेवला. त्या एफबी अकाऊंटवर फिर्यादी महिलेचे पुर्वीचे काही खासगी फोटो व्हायरल केले. त्यामुळे तिची समाजात बदनामी झाली.
दुसरे लग्न कशी करतेस, पाहतो म्हणत धमकी
याबाबत फिर्यादी महिलेने आरोपी पुर्व पतीला जाब विचारला असता आरोपीने तुझ्याकडून जे होते ते करून घे, तसेच तुझे दुसरे लग्न कसे होते, ते मी पाहुन घेतो, अशी धमकी दिली. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी फिर्यादी महिला तक्रार देण्यास धजावली नाही. मात्र, आता त्याच्या कृष्णकृत्याला आळा घातला नाही, तर तो पुढे अधिक त्रास देईल, ही शक्यता लक्षात घेऊन तिने १५ मार्च रोजी रात्री बडनेरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार बाबाराव अवचार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून तिचे बयान नोंदवून घेतले.