महापालिकेचा स्तुत्य निर्णय : चेतन पवारांचा पुढाकार अमरावती : महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या आजी-माजी सैनिकांना मालमत्ताकरातून सूट मिळणार आहे. त्यांच्या मालमत्ता टॅक्स फ्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. सोमवारच्या आमसभेत हा प्रस्ताव आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला. मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पीठासीन सभापतींनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेते चेतन पवार यांनी पुढाकार घेऊन हा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर चर्चा होऊन निर्णय झाल्याने शहरातील ८५० आजी-माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल पालिकेकडून बांधिलकी जोपासल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.ही सवलत दिल्याने पालिकेवर वार्षिक १० ते १२ लाख रूपयांचा बोजा पडत असला तरी सैनिकांबद्दलच्या भावना महत्त्वाच्या असून त्यापुढे दहा-बारा लाख रूपये गौण असल्याचे सांगून याबाबत प्रशासन अनुकूल असल्याचे आयुक्त पवार म्हणाले. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिल्ह्यातील पंजाब उईके यांना आलेले वीरमरणाच्या अनुषंगाने पवार यांनी आमसभेच्या सुरूवातीपूर्वीच आजी-माजी सैनिकांना मालमत्ताकरातून सूट देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला जयश्री मोरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी अनुमोदन दिले.सन २००२ ते २०१६ पर्यंत याबाबत अनेक प्रस्ताव आलेत. ते मंजूरही झालेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणीला विलंब का, असा सवालही आमसभेत उपस्थित झाला. यापूर्वीही महापालिका हद्दीत राहणाऱ्या आजी-माजी सैनिकांना मालमत्ताकरातून सवलत देण्याचा प्रस्ताव पारित करुन शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे या आमसभेत पारित ठराव शासनाकडे न पाठविता येथेच निर्णय घ्यावा, असे आग्रही मत नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी व्यक्त केले. तर चेतन पवार यांचे अभिनंदन करीत ‘देर आये दुरूस्त आये’ अशी टिप्पणी करुन विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी प्रस्तावाला दुजोरा दिला. याचर्चेत अविनाश मार्डीकर, तुषार भारतीय, गुंफा मेश्राम, निर्मला बोरकर, विलास इंगोले, निलिमा काळे, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, विजय नागपुरे, बबलू शेखावत, राजेंद्र तायडे, मिलिंद बांबल, बाळासाहेब भुयार, जावेद मेमन आदींनी सहभाग घेतला. शेवटी पिठासिन सभापतींनी अनुकूल निर्णय घेतला. (प्रतिनिधी)माजी सैनिकांद्वारे अभिनंदनराष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेते चेतन पवार यांनी पुढाकार घेऊन आजी-माजी सैनिकांबद्दल असलेली सामाजिक बांधिलकी अधिक वृद्धिंगत केल्याची भावना व्यक्त केली. या स्तुत्य निर्णयासाठी पुढाकार घेणाऱ्या पवार यांचे बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटनेद्वारे विशेष अभिनंदन करण्यात आले. सभागृहाबाहेर जमलेल्या शेकडो माजी सैनिकांनी पवार यांच्यासह महापालिका यंत्रणेचे आभार मानले.देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. तमाम भारतीयांच्या संरक्षणार्थ ते वीरमरण पत्करतात. अशा आजी-माजी सैनिकांना मालमत्ताकरातून सूट देणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल.- चेतन पवार, गटनेते
आजी-माजी सैनिकांच्या मालमत्ता ‘टॅक्स फ्री’
By admin | Published: September 27, 2016 12:10 AM