लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॅपटॉप चोरी प्रकरणात सोमवारी कोतवाली पोलिसांनी जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या १६ वर्षीय मुलासह चार आरोपींना अटक केली. अल्पवयीनाने चोरीला प्लॅन रचला होता. त्यांच्याकडून ४० लॅपटॉप, प्रोजेक्टर व सहा चार्जर असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.अकुंश साहेबराव गजभिये (२०), शैलेश भगवानदास चंडिकापूरे (२७, दोन्ही रा. संजय गांधीनगर), अभिषेक उमाशंकर व्यास (३३, रा.नवजीवन कॉलनी) व एका विधिसंघर्षित बालकाचा लॅपटॉप चोरीत सहभाग आहे. अंकुशला दोन दिवसाचा पीसीआर मिळाला, तर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गाडगेनगर हद्दीतील हा १६ वर्षीय मुलगा वर्षभरापूर्वी जवाहर नवोदय विद्यालयात शिकत होता.अशी केली लॅपटॉप चोरीअल्पवयीनाने फेसबुकवर काही गैरप्रकार केल्याचे शाळा व्यवस्थापनाला कळले होते. एका मुलीने त्याच्या कानशिलात लगावली होती. यामुळे शाळेतील शिक्षकाने त्याला हाकलून लावले होते. या शिक्षेचा राग अल्पवयीनाच्या मनात घर करून बसला होता. त्याने दहावीनंतर विद्याभारती महाविद्यालयात अकरावीत प्र्रवेश घेतला. तेथे शिकवणी वर्गासाठी पैशांची त्याला चणचण भासली. त्याचे आई-वडील विभक्त आहेत. तो आणि त्याचा भाऊ हे दोघेंही आईकडे असतात. त्याने शिकवणीचा खर्च काढण्यासाठी त्याने ओळखीतील तरुणांशी सगंनमत करून दिवाळीच्या दिवशी जवाहर नवोदय विद्यालयातील स्टोअर रूममध्ये ठेवलेले ४० लॅपटॉप चोरून नेले. या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर तपास सुुरू झाला. मात्र, चोरांचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान, कोतवाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी चोरट्यांना गजाआड केले.अल्पवयीनाला जवाहर नवोदय विद्यालयातील सर्व खोल्यांची माहिती होती. स्टोअर रूममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचा प्लॅन तयार केल्यानंतर त्याने लोखंड कापण्याची छोटी आरी विकत घेतली. दिवाळीच्या दिवशी दुपारी १२ वाजता शाळेचा आवारात त्याने प्रवेश केला. त्यावेळी दोन्ही सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्याने आरोपी अंकुश व आॅटो चालक शैलेशला बोलावून घेतले. त्याने स्टोअर रुमच्या खिडकीच्या लोखंडी सळाखी कापल्या आणि आत प्रवेश मिळविला. एक -एक करीत ४० लॅपटॉप अंकुश व शैलेशला दिले.कोतवाली पोलिसांना दहा हजारांचे बक्षीसबसस्थानक परिसरात आॅटोरिक्षाचालक लॅपटॉप खरेदी-विक्रीची चर्चा करताना कोतवाली पोलिसांना आढळून आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीआय मोहन कदम, डीबीचे अब्दुल कलाम, प्रफुल्ल खोब्रागडे, सागर ठाकरे, गजानन ढेवले, विनोद भगत यांनी माहिती काढून चालक शैलेश चंडिकापुरेला ताब्यात घेतले. यानंतर लॅपटॉप चोरीला पदार्फाश झाला. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दहा हजारांचे बक्षीस घोषित केले.७० हजारांची डीलअल्पवयीनाने संगणक हार्डवेअर व्यवसायातील अभिषेक व्याससोबत लॅपटॉप खरेदीचा व्यवहार केला. ४० लॅपटॉप खरेदीसाठी ७० हजारांची डील झाल्यावर ते लॅपटॉप अभिषेकपर्यंत पोहोचविल्या गेले. त्यावेळी अल्पवयीनाला अभिषेकने ७० हजार रुपये दिले.
माजी विद्यार्थ्याने चोरले जवाहर नवोदयचे लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:44 PM
लॅपटॉप चोरी प्रकरणात सोमवारी कोतवाली पोलिसांनी जवाहर नवोदय विद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या १६ वर्षीय मुलासह चार आरोपींना अटक केली.
ठळक मुद्देचौघांना अटक : ४० लॅपटॉपसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त