शोधप्रबंधही विद्यापीठात मेलवरच पाठवावा लागेल, परीक्षकांकडेसुद्धा शोधप्रबंधाची कॉपी ऑनलाईन जाणार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएचडी कोर्सवर्क परीक्षा अर्ज ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेने यासंदर्भात शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठात सतत येण्याची भानगड राहणार नाही, हे विशेष.
कोरोनामुळे विद्यापीठाने उन्हाळी २०२१ अभियांत्रिकी, फार्मसी, विधी व अन्य शाखांच्या परीक्षा ऑनलाईन आरंभल्या आहेत. आता पीएचडी कोर्सवर्क परीक्षेसाठी १२ ते २२ जुलै यादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागेल. साधारणत: कोरोना परिस्थितीचा विचार करून पीएचडी कोर्सवर्क परीक्षा २ ते ३ ऑगस्टपासून घेण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, हे वेळेवर निश्चित होईल, असे विद्यापीठ परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. ११०० विद्यार्थी पीएचडी कोर्सवर्क परीक्षा देतील, असे नियोजन आहे. नवसंशोधकांना शोधप्रबंधही विद्यापीठात मेलवरच पाठवावा लागेल. त्यानंतर विद्यापीठामार्फत परीक्षकांकडे शोधप्रबंधाची कॉपी ऑनलाईन पाठविली जाणार असल्याची माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
-------------
९७८ जणांना ऑनलाईन नोंदणी
विद्यापीठाने ४ नोव्हेंबर २०२० ते २४ मे २०२१ या दरम्यान आरआरसी अंतर्गत पीएचडीसाठी ९७८ जणांना ऑनलाईन नोंदणी दिली आहे. कोरोनाकाळात नव्याने ११५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, तर, २२१ गाईड नियुक्त करण्यात आले आहे. १२ ऑनलाईन रिसर्च केंद्रांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे.