अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा प्रकार येथे उघड झाला आहे. रविवारी शहरातील ५९ केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. पैकी नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत एका सहायक परीक्षकासह एका परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ७ मिनिटांनी हा गैरप्रकार निदर्शनास आल्याची तक्रार महिला केंद्रसंचालकांनी राजापेठ पोलिसांत नोंदविली.
खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत एक महिला अधिकारी टीईटी परीक्षेसाठी रवीनगरस्थित नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून कर्तव्य बजावत होत्या. या परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पर्यवेक्षक नेमण्यात आले होते. लढ्ढा हायस्कूलची जबाबदारी पर्यवेक्षक म्हणून पवनकुमार शिवप्रसाद तिवारी (४९, राजमातानगर) यांच्याकडे देण्यात आली होती. तिवारी हे सर्व शिक्षा अभियानामध्ये सहायक परीक्षक म्हणून मानधनावर कार्यरत आहेत. दरम्यान, परीक्षा सुरू असताना केंद्रसंचालक महिलेला तिवारी यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी तिवारी यांचा मोबाईल तपासला. त्यावेळी तिवारी याने टीईटीची प्रश्नपत्रिका काझी असे नाव असलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविल्याचे लक्षात आले. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. काझी हे देखील विषय साधन व्यक्ती म्हणून नांदगाव खंडेश्वर येथे कार्यरत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
दुसराही गैरप्रकार तेथेच
तिवारीचा मोबाईल जप्त केल्यानंतर तेथे हल्लकल्लोळ उडाला. ‘टीम एज्युकेशन’ अधिक सजग झाली. तपासणीदरम्यान, खोली क्रमांक ७ मधील एक परीक्षार्थींवर केंद्रप्रमुखाला संशय आला. त्याचा मोबाईल तपासला असता, त्याने टीईटीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवून पलीकडून उत्तरे मागितल्याचे लक्षात आले. त्या परीक्षार्थीची ओळख अकीब नवेद आरिफ बेग (२४, रा. खोलापूर) अशी पटविण्यात आली. याप्रकरणी रात्री ८.२५ च्या सुुमारास पवनकुमार तिवारी व अकीब बेग यांच्याविरुद्ध कलम ४२० व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी संबंधित महिला परीक्षा केंद्र संचालकांनी तक्रार नोंदविली. राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले. प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल.
प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद