(फोटो आहे. )
अमरावती : नांदगावपेठ पोलिसांना बोरनदी बृहत लघु प्रकल्पात एक कार बुडल्याची माहिती प्राप्त होताच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन चार तास शोधमोहीम राबविली. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
बोरनदी सिंचन प्रकल्पात अपेक्षित जलसंचय झाला आहे. त्यामुळे प्रकल्प पाहण्यासठी काही नागरिकांचा या ठिकाणी वावर असतो. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक कार बोर प्रकल्पावर गेली होती. मात्र, ती कार पुन्हा परत न आल्याने येथील तैनात सुरक्षा रक्षकाला शंका आली. त्यांनी ही माहिती नांदगावपेठचे ठाणेदार प्रवीण काळे यांना १० वाजताच्या सुमारास दिली. ठाणेदार काळे यांनी ११ वाजताच्या सुमारास आपल्या ताफ्यासह बोरनदी प्रकल्प गाठला. त्यानी पथकासह परिसरात तीन किमीपर्यंत कारचा शोध घेतला. मात्र, कार दिसून न आल्याने त्यांना अखेर रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रकल्पाकडे वाहन गेल्याचे टायरचे निशान दिसत आहे. मात्र, कार नेमकी गेली कुठे, हा प्रश्न चक्क पोलिसांनाही पडला आहे.
धरण क्षेत्रात विनापरवानी कुणालाही एंट्री नाही. मात्र गेट कुणाच्या सांगण्यावरून उघडे करण्यात आले. कार आतमध्ये गेली कशी याची माहिती पोलीस घेत आहेत. यासंदर्भात लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठविणार असल्याचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी सांगितले.