परतवाडा : भांडे चमकवून देण्याच्या निमित्ताने आलेल्या दोन भामट्यांनी, महिलेच्या डोळ्यादेखत तिचेकडील ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या दिवसाढवळ्या लंपास केल्यात. आरडाओरड झाली. पळापळी झाली. पण, भामटे कुणाच्याही हाती लागले नाहीत. त्या बांगड्यांची दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तहसील कार्यालयामागून जाणाऱ्या अचलपूर रस्त्याच्या कडेला, मनिरत्न कॉलनीतील पेट्रोल पंप परिसरातील माथने कुटुंबीयांकडे दोन भामटे शुक्रवारी सकाळी १० वाजता दरम्यान पोहचले. रोहिणी माथने या एकट्याच घरी होत्या. राजू माथने ड्युटीवर गेले होते. नेमका याचा अंदाज घेत या भामट्यांनी आम्ही भांडे चमकवून देतो, असे त्यांना सांगितले. रोहिणी माथने यांनी पितळीचे भांडे चमकविण्यास दिले. ते त्यांनी चमकवून दिले. यानंतर त्यांनी आम्ही सोन्या-चांदीचेही दागिने चमकून देतो, असे सांगितले. तेव्हा रोहिणी यांनी स्वतःकडील बांगड्या दिल्या. भामट्यांनी त्या बांगड्या पाण्यात टाकल्या. आणि रोहिणी माथने यांचे लक्ष विचलित करून बांगड्या घेऊन पसार झाले. घटनेनंतर माथने यांनी आरडाओरड केली. शेजारी त्या भामट्यांना पकडण्याकरिता धावले. परंतु, ते भामटे हाती लागले नाही. घटनेची माहिती राजू माथने यांना मिळताच ते घरी पोहोचले. त्यांनी अचलपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. तक्रारही दाखल केली. अचलपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
ते नमस्कार करणारे कोण?
या घटनेपूर्वी घराबाहेर पडलेल्या राजू माथने यांना या दोन भामट्यांनी नमस्कार केल्याची माहिती आहे. असेल कुणीतरी म्हणून त्यांनीही त्यांचा नमस्कार स्वीकारला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोघांपैकी एक काळा सावळा उंचपुरा व देखना, तर दुसऱ्याचे केस लांब व गोल्डन कलरचे असल्याचे तक्रारीत नमूद आहे.