मुख्यमंत्र्यांची ग्वाही : पालकमंत्री, आमदारांची उपस्थितीअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणारा बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच गती देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे आयोजित बैठकीत दिली. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, एअर इंडिया कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामांची माहिती जाणून घेताना ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्यात. विमानतळावरून ७२ आसनी ‘एटीआर’ विमानांचे उड्डाण लवकरच सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. विमानांच्या उड्डाणासाठी सध्या अस्तित्वात असलेली १३०० मीटरची धावपट्टी आता १८०० मीटर लांब करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला. विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पाणीपुरवठा योजना, उच्चदाब विद्युतवाहिन्यांचे स्थलांतरण आणि अस्तित्वातील पॉवर स्टेशनमध्ये परावर्तीत व विस्तारकामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली. यासाठी जीवन प्राधिकरण व महावितरणला अनुक्रमे १.५६ कोटी व ११.२४ कोटींची रक्कम देण्यात आली. या दोन्ही कामांच्या निविदा संबंधित विभागाने सुरू केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव पी.एस. मीना यांनी दिली.बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्त्याच्या स्थलांतरणाचे काम प्रलंबित असून त्याकरिता ११.५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे काम महाराष्ट्र विकास कंपनीकडून करण्यात येईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बेलोरा विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीने दौरा केल्यानंतर बेलोरा विमानतळ, चिखलदरा पर्यटनस्थळ विकास व महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पासंदर्भाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. या दौऱ्याच्या अनुषंगाने समितीचे प्रमुख आमदार सुनील देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक सुद्धा घेतली होती, हे विशेष.
बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच
By admin | Published: April 13, 2016 12:17 AM