लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक जयंत वडते यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत असला तरी त्यांना वर्षभरासाठी मुदतवाढ मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे. यापूर्वी संचालक पदासाठी मागविलेल्या अर्जाबाबत विद्यापीठ प्रशासनाने अद्यापपर्यत कोणतीही कार्यवाही चालविली नाही, हे विशेष.विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन संचालक हे पद अतिशय महत्वाचे आहे. यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा व मूल्यमापन संचालक पदाच्या निवडीसाठी रितसर अर्ज मागविले आहे. यात १५ जणांनी अर्ज सादर केले असून, मात्र व्यवस्थापन परिषद गठन झाले नसल्याने ही निवड प्रक्रिया लांबणीवर पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे. कुलसचिवांकडे अर्जाची छानणी, मुलाखत आदी सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी असते. मात्र, सिनेट सदस्य भीमराव वाघमारे यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा मुद्यावरून उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेचे गठन झाले नाही. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांशिवााय निवड प्रक्रिया राबविता येणार नाही, असे संकेत आहे. परीक्षा व मूल्यमापन संचालक पदाच्या नव्या निवडीसाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. तथापि, विद्यापीठ प्रशासनाने कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा विभागाचा डोलारा पुन्हा जयंत वडते यांच्याकडेच सोपविला जाईल, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.व्यवस्थापन परिषदेत राज्यपाल नामानिर्देशीत दोन सदस्यांची नियुक्ती आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्यपाल कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. ही दोन नावे प्राप्त होताच नव्या परीक्षा व मूल्यमापन संचालक पदाची निवड प्रक्रिया आरंभली जाईल.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती.
विद्यापीठात परीक्षा संचालकपदाला मुदतवाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 10:53 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक जयंत वडते यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत असला तरी त्यांना वर्षभरासाठी मुदतवाढ मिळण्याचे चिन्हे दिसून येत आहे.
ठळक मुद्देहालचालींना वेग : परीक्षा व मूल्यमापन संचालक निवडीला तुर्तास ब्रेक