जैनांच्या काशीत अनेक समस्या : बसस्थानकावर प्रसाधनगृह व्हावेकिशोर लेंडे भातकुलीभातकुली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने आता शहराचा झपाट्याने विकास होईल, अशी अपेक्षा भातकुलीवासी व्यक्त करीत आहेत. त्यातल्या त्यात स्थानिक बसस्थानकात प्रसाधनगृह व्हावे, अशी महिलांची मागणी आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी यांसह इतर मागण्यांकडे लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, घनकचऱ्याची विल्हेवाट, हिंदू स्मशानभूमिचे सौंदर्यीकरण, पथदिवे, बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय या मूलभूत समस्या सोडविण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत. शिवाय शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. ते अरूंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे अतिक्रमण काढल्यास रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील तसेच शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असे सामान्य जनतेचे म्हणणे आहे. तालुकास्तरीय ग्रांपचे रूपांतरण नगरपंचायतीत झाल्याने आता शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. आता विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या नगर विकासाचा निधी मिळत असल्याने मुलभूत सुविधांसह इतर अनेक विकासात्मक कामे करणे शक्य होणार आहे. मात्र, ती करताना कृती विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तेव्हाच शहराचा नियोजनबध्द विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत भातकुली शहरातील प्रमुख रस्ते उखडले आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या नाहीत. या नाल्या बांधल्यास सांडपाण्याची विल्हेवाट पध्दतशिरपणे लावता येईल. लहान मुलांसाठी एखादे उद्यानही साकारले जावे, असे येथील जनतेचे म्हणणे आहे. येथील बसस्थानकावर प्रसाधनगृह नसल्याने प्रवाशांचे, विशेषत: महिला प्रवाशांचे हाल होत आहेत. दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा होते. जैनांचे तीर्थस्थळ उपेक्षितचतालुक्याचे ठिकाण व जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या भातकुली शहराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला. शहराला पौराणिक इतिहास आहे. त्यामुळे या शहराला तीर्थक्षेत्र विकास निधी देखील मिळणार आहे. यातून बसस्थानकावर आवश्यक सोयी पुरविण्यात याव्यात तसेच इतरही समस्या मार्गी लावाव्यात, अशी जनतेची मागणी आहे.
नगरपंचायतीमुळे वाढल्या भातकुलीवासीयांच्या अपेक्षा
By admin | Published: February 13, 2016 12:09 AM