- संदीप मानकर
अमरावती : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. २०१९-२० मध्ये २५०० हेक्टर, तर २०२० -२१ मध्ये पाच हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन या प्रकल्पातून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. अनुशेषांतर्गत सदर प्रकल्प असून, हा प्रकल्प सद्यस्थितीत एसआयटी चौकशीच्या विळख्यात अडकला आहे. या प्रकल्पाची ७३६.५८ दलघमी पाणीसाठवन क्षमता राहणार आहे. १ लाख १ हजार ८८ हेक्टर एवढे सिंचनाचे नियोजन घडभरणीनंतर पहिल्या वर्षी ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ‘जिगाव’ प्रकल्पाची अद्ययावत किंमत १३ हजार ७४५.१८ कोटी आहे. ३१ मार्च २०१८ अखेर या प्रकल्पावर ३०७७.१२ कोटींचा खर्च झाला आहे. यातील काही निविदा ह्या वादग्रस्त ठरल्या असून त्याची शासनाने चौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये दोषी आढळलेल्या तत्कालीन अधिकारी व कंत्राटदारविरोधात एसआयटीने चौकशीअंती गुन्हा नोंदविला होता. या प्रकल्पाची उर्वरित किंमत १०६६८.०६ कोटी आहे. यामध्ये सन २०१८-१९ मध्ये शासनाने ३४३.३४ कोटींची तरतूद केली आहे. प्रकल्पसाठी सन २०१९-२० मध्ये २४८९.०६ कोटी, २०२०-२१ मध्ये २७०६.१७ कोटी, २०२१-२२ मध्ये १७४६.१० कोटी, तर सन २०२२-२३ मध्ये २४३६.७६ कोटींचा निधी लागणार आहे. त्याच कारणाने हा प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. १४,९१२.३२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता जिगाव प्रकल्पासाठी एकूण १४ हजार ९१२.३२ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. यामध्ये सरळ खरेदीने ५६९.१० हेक्टर, तर प्रक्रियेव्दारे १५७३.०१ हेक्टर करण्यात आली आहे. एकूण २१४२.११ हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून, १२,७७०.२१ हेक्टर भूसंपादन बाकी आहे. याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून, ते प्रक्रियेत आहे. १२४४.४७ हेक्टरचा भूसंपादनासाठी अद्यापही प्रस्तावच सादर केलेला नाही.
३२ गावठाणे पूर्णत: बाधित या प्रकल्पासाठी ३२ गावठाणे पूर्णता: बाधित असून, सात गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित भूसंपादन प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्य अभियंत्यांनी दिली. नवीन गावठाणाच्या नागरी सुविधेसाठी ३ गावे पूर्ण व दोन गावांच्या नागरी सुविधा प्रगतीपथावर आहेत.