परतवाडा : खासदार नवनीत राणा यांच्याकडे वनविभागातील काही महिला कर्मचाऱ्यांनी श्रीनिवास रेड्डी यांची हुजरेगिरी केली. त्यावर तात्काळ नवनीत राणा यांनी त्यांची खरडपट्टी काढत त्यांना चांगलेच सुनावले. वनपाल वनरक्षक संघटनेने त्या महिला कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बालाप्रमाणे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीसुद्धा जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असतानाच शनिवारी खासदार नवनीत राणा यांच्याकडे काही महिला कर्मचारी थेट त्यांची शिफारस घेऊन पोहोचल्या. त्यावर खासदार राणा यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा सर्व प्रकार अत्यंत घृणास्पद असून आपल्या एका भगिनीच्या आत्महत्येच्या चितेची राख अजून शांत व्हायच्या अगोदर सुरू झालेली हुजरेगिरी संतापजनक असल्याचे खासदार म्हणाल्या.
‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चा
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ‘लोकमत’मधील वृत्ताची सर्वत्र चर्चा होती. श्रीनिवास रेड्डी यांच्याबद्दल चांगले लिहून देण्यासाठी टाकण्यात आलेल्या दबावाचे प्रकाशित वृत्त चांगलेच चर्चेत होते.
बॉक्स
एसीत बसून जंगलाचे संरक्षण
श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यालयातील या महिला कर्मचारी असून त्यातील काहींना केवळ ११ महिन्यांची ऑर्डर आहे. चार ते पाच वर्षांपासून त्या तेथेच ठाण मांडून आहेत. काही महिला कर्मचारी मेळघाटात कार्यरत असून, त्यांची प्रतिनियुक्ती रेड्डींच्या कार्यालयात करण्यात आली आहे. एसीत बसून जंगलाचे काम करणाऱ्या या महिलांबद्दल प्रचंड संताप संघटनांनी व्यक्त केला. मंगळवारी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना व इतर संघटनांच्यावतीने त्यांना जाब विचारला जाणार आहे.
कोट
कुठल्याच दबावातून वनकर्मचारी अधिकाऱ्यांनी हुजेरीगिरी करू नये, काही महिलांनी तसे लिहून दिले. त्यानंतर दबावातून हा प्रकार असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. यासंदर्भात मंगळवारी अमरावती येथे संघटनेच्यावतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.
- प्रदीप बाळापुरे,
अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना
अमरावती