अमरावती : आगामी आर्थिक वित्तीय वर्ष २०२०-२१ संपण्यासाठी आता अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत वित्त विभागाचे जिल्हा निधीतून विविध विभागांना उपलब्ध केलेल्या निधी खर्चाचा विस्तृत लेखाजोखा मागविला आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर वित्त विभागाकडून आगामी सन २०२१-२२ च्या बजेटची प्राथमिक तयारी करण्यासाठी वित्त विभागाची लगबग सुरू झालेली आहे.
जिल्हा परिषदेला विविध माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या उत्पन्नावर आधारित बजेट तयार केले जाते. यात शासनाच्या सूचनेप्रमाणे समाजकल्याणकरिता २० टक्के, महिला बालकल्याणसाठी १० टक्के, दिव्यांग व शाळा दुरुस्तीसाठी प्रत्येकी ५ टक्के आणि देखभाल दुरुस्तीसाठी २० टक्के असा ६० टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यामुळे उर्वरित ४० टक्के निधीतून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामे तसेच अन्य प्रशासकीय कामकाजाकरिता आर्थिक तरतूद केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ या वर्षातील बजेटमधून विविध विभागांना विकासकामे, योजनांकरिता उपलब्ध केलेल्या निधीत संबंधित विभागाकडून किती रक्कम खर्च झाली आणि किती शिल्लक आहे. याची विस्तृत माहिती सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहे. याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
बॉक्स
२७ मार्चपूवी होणार बजेट
दरवर्षी जिल्हा परिषदेचे बजेट तयार केले जात आहे. त्यानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे बजेट तयार केले जाणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेचे बजेट २७ मार्चपूर्वी मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आगामी बजेट २७ मार्र्चपूर्वी मंजूर केले जाणार असल्याचे मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी सांगितले.