अमरावती : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही त्रास होत आहे. यासाठी केंद्रामधील कक्षात किमान अर्धा विश्रांती करणे महत्त्वाचे आहे. मात्र, याचा सोईस्कर विसर आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पडला आहे. दुसऱ्या लाटेत लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्यानंतर अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबणे याचा सर्वांनाच विसर पडला. लसीची रिॲक्शन एखाद्यालाच होत असली तरी एखादवेळी ही दिरंगाई महागात पडू शकते.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत दोन्ही लसी परिणामकारक आहे. यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन्ही डोस घेणे नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात १०० वर लसीकरण केंद्र आहेत व प्रत्येक केंद्रात एक निरीक्षण कक्ष आहे. लसीकरण झाल्यावर एखाद्याला काही त्रास होतो काय, हे पाहण्यासाठी या कक्षात प्रत्येक नागरिकाला २० ते ३० मिनिटांपर्यंत थांबणे अनिवार्य आहे. बहुतांश नागरिक लस घेतल्यानंतर लगेच निघून जातात. याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लक्ष दुर्लक्ष आहे. ही अंगलट येणारी बाब ठरू शकते.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पाच टप्प्यात आतापर्यंत ५,७१,५७३ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पाईंटर
आतापर्यंत झालेले लसीकरण : ५,७१,५७३
पहिला डोस : ४,२७,६६७
दुसरा डोस : १,४३,९०६
लसीकरण केंद्र
ग्रामीण : १००
शहर : १९
बॉक्स
कोरोना प्रतिबंधासाठी लस प्रभावी
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. याद्वारे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाद्वारा अधिकतम नागरिकांचे लसीकरण व्हावे. यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आले. लसीकरणाबाबत गैरसमज नको याकरिता जनजागृती सुरू आहे. संसर्ग रोखण्यासाठी लस हे एकमात्र औषध आहे.
बॉक्स
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी
लसीकरण झाल्यावर कुणाला त्रास होतो काय, हे पाहण्यासाठी तसेच रिॲक्शन होते काय याची पाहणी करण्यासाठी प्रतीक्षा कक्षात किमान २० ते ३० मिनिटे विश्रांती करणे आवश्यक आहे. याबाबत या केंद्रांवर नोंद केली जाते व आवश्यकता असल्यास औषधीदेखील दिली जात असल्याने अर्धा तास तरी या कक्षात घालविणे महत्त्वाचे आहे.
कोट
लसीच्या पुरवठ्यानुसार पहिला व दुसऱ्या डोसचे नियोजन केले जाते. केंद्रांवर नोंदणी, लसीकरण व विश्रांती असे तीन कक्ष असतात. यापैकी विश्रांती कक्षात २० ते ३० मिनिटांपर्यंत थांबणे महत्त्वाचे आहे. त्यापूर्वी कक्षाबाहेर पडू नये.
- डॉ विशाल काळे,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी