शासनाकडे प्रस्ताव : सोमवारी देणार अहवालअमरावती : अंबानगरीचे वैभव असलेले श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या वाड्याची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ चमुने शनिवारी पाहणी केली. यापूर्वी सोमवारी महापालिकेने खापर्डे वाड्याच्या इमारतीची मोजणी केली होती. ही इमारत संरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी या तज्ज्ञांना पाचारण केले होते. दरम्यान मंगळवारीच कुणीतरी अज्ञाताने इमारतीचा काही भाग हेतुपुरस्सर तोडल्याचा आरोप आहे. त्यावर आयुक्त चंद्रकांत गुडेवार व आ. रवी राणा यांनीही भेट दिली होती.शनिवारी उपयोजित यंत्रशास्त्र विभागाचे तज्ज्ञ चमू व प्राचार्य दिलीप चौधरी यांनी खापर्डे वाड्याची पाहणी केली. त्यांच्या समवेत महापालिकेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद इंगोले ही उपस्थितीत होते. इमारत संरक्षित आहे की नाही या संदर्भाचा पाहणी अहवाल ही चमू सोमवारी महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे. या अहवालानंतरच महापालिका शासनाला खापर्डे वाडा प्रकरणाचा प्रस्ताव पाठविणार आहे. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकीच्या तज्ज्ञांनी केली खापर्डे वाड्याची पाहणी
By admin | Published: December 06, 2015 12:05 AM