अमरावती :बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने देशभऱ्यातील जिल्हा व तालुकास्तरावर लोकशाही मजबुतीकरिता व निवडणुकीतील विश्वास कायम ठेवण्यासाठी ईव्हीएम मशीनची शहरात मंगळवारी अंत्ययात्रा काढून जनजागृती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये पेपर ट्रेलरचा उपयोग केला असताना तो व्यवस्थित ओळखू येत नाही, अशातच सुलभरीत्या मशीनमधून बाहेर पडत नाही. त्यामुळे पेपर ट्रेलर लावणे आवश्यक आहे. या निर्णयानंतरही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला. बाहेर कागद पडताना मतदान यंत्राच्या उपयोगातून मतदाराने मत कोणत्या पक्षाला दिले याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता राहिली नाही. या प्रकारात इव्हीएमचा दुरुपयोग केला जात असल्याने लोकशाहीचा घात होत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता कमी होत चालल्याने लोकशाही वाचविण्यासाठी आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासाठी ही अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सुनील डोंगरदिवे, रवींद्र राणे, रंजना चव्हाण, ललिता तायवाडे, अंकुश राऊत, उज्ज्वला चव्हाण, गजानन गीते, रणजित बसवनाथे, संतोष बनसोड, गौरव गेडाम, रंजना पाटील, अर्चना गोसावी, बसवनाथे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
बहुजन मुक्ती पार्टीने काढली ईव्हीएमची अंत्ययात्रा
By admin | Published: January 22, 2015 12:05 AM