अमरावती : जिल्हा बँकेसह व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात किमान १.१० लाख खातेदारांना कर्ज भरण्यास एक महिण्याची मुदत मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
कोरोनाचे दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आल्या. जिल्हा बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासनादेश प्राप्त झाल्याचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
जिल्हा बँकेचे ५२ हजार नियमित खातेदार
जिल्हा बँकेचे ५२ हजार शेतकरी हे नियमित खातेदार आहेत. यापैकी ४६ हजार खातेदारांनी कर्जाची परतफेड करुन नव्याने कर्ज घेतले आहे. याशिवाय व्यापारी बँकांचे ५८ ते ६० हजार नियमित खातेदार आहे. यासर्व खातेदारांना आता ३१ जुलैपर्यत पीक कर्जाची परतफेड करता येणार आहे. या कालावधीत वसूलीस बँकाना मनाई करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबमधकांनी सांगितले