अमरावती - राज्यातील आठ प्रकल्प वगळता सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील व जलाशयावरील खासगी उपसा सिंचन योजनांना ७ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला.
टेंभू उपसा सिंचन योजना (सांगली), भीमा (उजनी), मुळा सिंचन योजना (अहमदनगर), निम्न मानार (नांदेड), हतनूर, ऊर्ध्व पूस (यवतमाळ), कान्होली नाला (नागपूर), अंबोली (सिंधुदुर्ग) हे प्रकल्प वगळून राज्यातील इतर सर्व पाटबंधारे प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) २००५ च्या कलम १२ (६) (घ) मध्ये नमूद केल्यानुसार पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या अटीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने प्राप्त होणाºया खासगी उपसा सिंचन योजनांच्या प्रस्तावांतील बारमाही पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरणे बंधनकारक राहणार असल्याचे सदर शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.