वैभव बाबरेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पैसे कमविण्यासाठी कोण, कोणता फंडा अंमलात आणेल, याचा काही नेम नाही. कबुतरांची शिकार केल्यानंतर त्यांची विक्री करून बराच पैसा मिळत असल्याने शिकाऱ्यांनी कबुतरांना टिपण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. मात्र, कबुतरांचे डोळे बाभळीच्या काट्यांनी शिवून आणि त्यांना खुंटीला बांधून ठेवण्याचा अघोरी प्रकार भातकुलीनजीकच्या मलकापुरात ‘कार्स’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. याप्रकरणात नितीन गणेश पारिसे (रा.सुकळी,२२)नामक आरोपीला पकडण्यात आले होते. मात्र, त्यानेही पलायन केले आहे. तर विजय प्रल्हाद पारिसे, रवी मनोहर पारिसे हे दोन आरोपीही पसार आहे. विस्तृत माहितीनुसार, वन्यजीवांच्या सरंक्षणासाठी कार्यरत कार्स संस्थेचे राघवेंद्र नांदे यांच्यासह चेतन भारती, शुभम गिरी, सावंत देशमुख व रोशन अबु्रक हे शुक्रवारी दुपारी भातकुलीहून अमरावतीकडे दुचाकीने येत असताना मलकापूर शेतशिवाराजवळ त्यांना हा प्रकार दिसून आला. काही युवक कबुतराची शिकार करण्यासाठी जाळे पसरवून बसल्याचे त्यांना दिसून आले. नेमका प्रकार जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी तेथे दुचाकी थांबविल्या. यानंतर त्यांना आढळलेला प्रकार अत्यंत अघोरी होता. आरोपी युवकांनी एका जाळ्यात कबुतर बांधून ठेवले होते. ते कबुतर सुटकेसाठी धडपडत होते.त्या कबुतराचे डोळे चक्क बाभळीच्या काट्याचा वापर करून शिवून टाकले होते. असहाय्य अवस्थेत तो कबुतर उडण्याची धडपड करीत होता. मात्र, त्याचा प्रयत्न अयशस्वी होता. एकच नव्हे, चक्क चार कबुतर अशाच पद्धतीने थोड्या-थोड्या अंतरावर बांधून ठेवण्यात आले होते. या कबुतरांकडे आकृष्ट होऊन इतर कबुतरही तेथे गोळा होत. या कबुतरांना शिकारी सहजरीत्या जाळ्यात अडकवून त्यांची शिकार करीत होते. हा धक्कादायक प्रकार पाहून कार्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीनही शिकाऱ्यांना पकडण्याचा खटाटोप केला. मात्र, दोघे घटनास्थळावरून पसार झाले. एका युुवकाला पकडण्यात कार्सच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. त्यांनी त्याला घेऊन वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले आणि वनविभागाच्या स्वाधिन केले. पशुवैद्यकीय चिकित्सक अशोक किनगे यांनी कबुतरांची पाहणी करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले होते. डोळे काट्यांनी बांधल्याने या कबुतरांना अंधत्व येण्याची शक्यता वर्तविली आहे. पुढील औषधोपचार कार्सचे राघवेंद्र नांदे करीत आहेत. वनविभागाने शिकाऱ्याच्या साहित्यासह १० कबुतर जप्त केले. कार्सच्या पदाधिकाऱ्यांनी कबुतरांच्या शिकाऱ्याला वनविभाग कार्यालयात नेले. मात्र, त्यांना पुढील कारवाईसाठी ताटकळत बसून राहावे लागले होते. एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे कारवाईस विलंब झाला. दरम्यानच नितीन पारिसे हा आरोपी तेथून पसार झाला. कबुतर शिकारप्रकरणात वन्यप्रेमींनी एका युवकाला पकडले होते. त्याने पलायन केले आहे. या शिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करू. कबुतरांचे डोळे शिवून शिकार करण्यासाठी वापरलेला हा प्रकार अत्यंत क्रूर आहे. - एच.व्ही.पडगव्हाणकर, वडाळी वनपरिक्षेत्र. अधिकारी अर्धांगवायूवरील उपचारासाठी कबुतरांची विक्रीअर्धांगवायूवरील उपचारांसाठी कबुतराचे मांस शिजवून खाल्ले जाते. रक्त अंगाला लावल्यास ‘पॅरेलिसिस’चा आजार बरा होतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे अर्धांगवायूने बाधित रूग्णांना शिकारी ५० रूपयांना एक याप्रमाणे कबुतरांची विक्री करतात. अटकेतील आरोपींनीदेखील हाच व्यवसाय सुरू केला होता.
बाभळीच्या काट्याने शिवले कबुतरांचे डोळे
By admin | Published: July 01, 2017 12:04 AM