दर्यापूर (अमरावती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. प्रमोद कुटे यांच्यासारख्या हाडामासाच्या प्रामाणिक शेतकऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कुटेंसारख्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा काय, असा प्रश्न भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी दर्यापूर येथे उपस्थित केला.
दर्यापूर शहरातील साईनगर येथील उच्चशिक्षित शेतकरी प्रमोद कुटे यांनी पत्नीचे दागिने विकून व उसनवार करुन कर्ज भरले होते. पण, या शेतकरी कुटेंना जुजबी मदत शासनाने देऊ केली आहे. त्याविरोधात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ही बाब कानावर पडल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शनिवारी त्यांची भेट घेतली. मागील सरकारने केलेल्या सरसकट कर्जमाफीची आठवण देत पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या वेदना मुख्यमंत्र्यांना समजत नसतील, तर ही बाब दुर्दैवी आहे. सरसकट कर्जमाफी दिली असती, तर प्रमोद कुटे यांसारख्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर जावेच लागले नसते. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंतही दानावरच भागवले असून, त्यांना कुटेंनी दिलेली शेतीसुद्धा कमी पडणार आहे. त्यामुळे कुटेंनी आपल्या कुटुंबाला आधार देत आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन आदर्श शेतकरी म्हणून जगावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच प्रमोद कुटे, कल्पना कुटे व मुलगी पल्लवी कुटे यांना धीर दिला.