अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुरूवारी एमआयडीसीतील एका कारखान्यात धाड घालून बनावट व दर्जाहिन सिमेंटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी घटनास्थळाहून इशाक कासम कालीवाले (३५,रा. फ्रेजरपुरा) याला अटक केली होती. शुकवारी या प्रकरणी आरोपी इशाकला खडे झालेले, मुदतबाह्य सिमेंट पुरविणाऱ्या पुरवठादाराला अटक करण्यात आली. राहुल रतावा (रा. सराफा परिसर, अमरावती) असे अटक पुरवठादाराचे नाव आहे.
राहुल रतावा याचे इतवारा बाजार परिसरात राहुुल सिमेंट डेपो हे प्रतिष्टान असून, त्याच्याकडे नामांकित कंपनीच्या सिमेंटची एजंसी आहे. रतावा हा त्याच्या सिमेंट डेपोतील निकृष्ट, खराब झालेले व मुदतबाहय सिमेंट कंपनीकडे परत न करता, तो ते खराब सिमेंट इशाकला विकायचा. इशाक त्या सिमेंटला चाळणी करून नामांकित कंपनीच्या बॅगमधून भरून ते विकायचा.
इशाकच्या कबुलीजबाबानंतर राजापेठ पोलिसांनी रतावा याला अटक केली. तत्पुर्वी सीपींच्या विशेष पथकाला इशाक हा सिमेंट विक्री बाबतचा कोणताही परवाना नसताना खराब झालेले दर्जाहीन सिमेंट आणून ते एका सिमेंट कंपनीच्या प्लास्टिक पोत्यामध्ये भरून त्याची पॅकिंग करून लोकांना स्वस्त दरामध्ये अवैधरीत्या विक्री करताना मिळून आला होता. त्याच्या ताब्यातून एक चारचाकी मालवाहू वाहन तथा ६०० पोते सिमेंट बॅग असा चार लाखांचा माल ताब्यात घेण्यात आला होता. संबंधित सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष ही कारवाई करण्यात आली. आरोपी व माल राजापेठ पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला.
असा होता गैरप्रकार
एमआयडीसीमध्ये भाड्याने जागा घेऊन शेख ईशाकने हा गोरखधंदा पाच ते सहा महिन्यांपासून सुरू केला होता. तो इतवारा बाजारातील राहुल सिमेंट डेपोतून मुदतबाहय् व खडे झालेले सिमेंट प्रति गोणी २१० रुपयांमध्ये खरेदी करायचे. त्या सिमेंटच्या बॅग एमआयडीसीमधील त्याच्या कारखान्यात आणायच्या, ज्या बॅगमध्ये खडे तयार झाले आहेत, त्या बॅगमधील खडे काढून फेकायचे तसेच उर्वरित बारीक भुकटी गाळून घ्यायची आणि हीच भुकटीनामांकित कंपनीच्या सिमेंट बॅगमध्ये भरायची. त्या बॅगला शिलाई मारुन ती बॅग ३३० रुपयांनी बाजारात विक्रीसाठी आणायची, असा तो गोरखधंदा होता. नामांकित कंपनीची ती सिमेंट बॅग बाजारात ३६५ रुपयांमध्ये विकली जाते.