अमरावती : आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे रोज नवे फंडे समोर येत आहेत. जिल्ह्यात खारतळेगाव येथे सोमवारी मध्यरात्री बनावट डीएपीची ६३ पोती कृषी विभागाने जप्त केली व या प्रकरणी वलगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे विक्री करण्यात येणाऱ्या ‘सरदार’ या ब्रांडच्या खतांची विक्री दोन वर्षांपासून कंपनीद्वारा बंद असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
भातकुली तालुक्यात बनावट डीएपी खतांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच कृषी पथकाने खारतळेगाव येथील शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता सात शेतकऱ्यांनी खत खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार बनावट खतविक्री करणारा मिलिंद वानखेडे (३२, ढंगारखेड) यांच्याविरुद्ध खते नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खताच्या ६३ पोत्यांचा ८८,२०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपीने यापूर्वी माधान येथे २१ पोत्यांची विक्री केली आहे. याचे वृत्त माध्यमांमध्ये येताच शेतकरी सतर्क झाले व त्यांनी ही खते कमी किमतीत विकत घेतल्याचे कृषी विभागाला सांगितले. या कारवाईत एसएओ अनिल खर्चान, एडीओ जी. टी. देशमुख, डीएओ अजय तळेगावकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी दादासो पवार, अश्विनी चव्हाण, उध्दव भायेकर, कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे आदी सहभागी होते.
या टेस्टद्वारे ओळखले जाते बनावट डीएपी
भेसळयुक्त डीएपी ओळखण्यासाठी हातावर थोडे खत घेऊन त्यावर थोडा चुना व पाण्याचे थेंब टाकतात, डीएपीमधील अमोनियम कार्बोनेट व चुण्यातील कॅल्शियम कार्बोनेट यावर रासायनिक प्रक्रिया होऊन अमोनिया हा नाकाला झोंबणारा वायू निघतो. मात्र, या बनावट खतात रेती व माती असल्याने मातीचा चिखलच हातावर झाल्याचे एडीओ जी. बी. देशमुख यांनी सांगितले.
‘बलवान’ची १० व ‘सरदार’ची ५३ पोती जप्त
या कारवाईत हिंडलका इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला ग्रुपच्या ‘बलवान’ या ब्रांडची बनावट १० पोती व गुजरात स्टेट फर्टिलायझर ॲन्ड केमिकल कंपनीच्या ‘सरदार’ या ब्रांडची बनावट ५३ पोती. यावेळी कृषी विभागाद्वारा जप्त करण्यात आली. थेट कंपनीतून खरेदी असल्याने जीएसटी वाचतो व स्वस्त्यात घरपोच देऊ शकतो, असे आरोपीने सांगितल्याचे शेतकरी म्हणाले.