अमरावती : बनावट राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) अथवा एम. फिल. परीक्षा प्रमाणपत्राबाबत जे काही चुकीचे असेल त्याची चौकशी वजा शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. मला मुंबईला जाऊ द्या, असे म्हणत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भूमिका स्पष्ट केली.
ना. चंद्रकांत पाटील हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ‘मीट द प्रेस’मध्ये ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या नागपूर, अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात बनावट नेट/सेट परीक्षा प्रमाणपत्राबाबत विचारले असता, आपली रोखठोक भूमिका जाहीर केली. उच्च शिक्षण क्षेत्रात असे दुर्दैवी प्रकार घडत असतील तर दोषींना पाठीशी घालण्याचे कोणतेही कारण नाही, असेही ते म्हणाले. हे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा शोध लावणे हे देखील भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. चुकीच्या गोष्टींचा उच्च शिक्षण क्षेत्रात शिरकाव होत असेल तर त्याविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे, यासंदर्भात ना. पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. मीट द प्रेसमध्ये खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, महापालिकेतील भाजपचे नेते तुषार भारतीय आदी उपस्थित होते.
- तर सात वर्षांची शिक्षा अन् दंडही
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला, विज्ञान महाविद्यालयाचे सहयाेगी प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांचे नेट पात्रता परीक्षा प्रमाणपत्र ‘फेक’ असल्याचे यूजीसीने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केले. त्यामुळे प्राध्यापक अथवा सहयोगी प्राध्यापक यांनी बनावट प्रमाणपत्र तयार करणे आणि त्याचा लाभ घेतल्याप्रकरणी भादंविच्या ४२०, ४६८ कलमान्वये सात वर्षांची शिक्षा आणि न्यायालय परिस्थितीग्राह्य धरून दंड आकारते, अशी माहिती ॲड. किशोर शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.