अमरावती : पुण्यात राहणाऱ्या मूळ मालकाऐवजी तोतयाला उभे करून बनावट आधार कार्डच्या साहाय्याने दोन प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आली. यंदाच्या ३ जानेवारी ते ३१ मार्च यादरम्यान येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला. मूळ मालकाने ऑनलाइन सात-बारा उतारा काढल्याने हा गोरखधंदा उघड झाला. या प्रकारामुळे पंकज मधुकर आगरकर (५०, रा. हडपसर, पुणे) यांना मानसिक धक्का बसला आहे.
याप्रकरणी आगरकर यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी तब्बल आठ जणांविरुद्ध फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये सुरेश टाले (४३, रा. रेवसा), कन्हैया पांडे (३२, रा. दहिसाथ चौक, अमरावती), किशन भट्टड (६२, रा. चंद्रपूर), अभिजित गरड (रा. नाशिक), शेखर काळमेघ (रा. धामणगाव), सुनील करवा (रा. अमरावती), अजमद खान लियाकत खान (रा. भानखेडा, अमरावती) व एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. पंकज आगरकर यांच्या मालकीच्या मौजा कठोरा व मासोद येथील दोन प्लॉटची परस्पर विक्री करून त्या व्यवहाराची नोंदणी देखील करण्यात आली. तलाठी आणि रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन खात्री केली असता आगरकर यांच्या पायाखालची वाळू सरकली. खोटे दस्तावेज, खोेटे आधार कार्ड बनवून, इतकेच नव्हे तर तोतया मालक उभा करून आपली फसवणूक केल्याचा आरोप आगरकर यांनी केला आहे.
दोन्ही खरेदीत बनावट आधार कार्ड
फिर्यादी पंकज आगरकर हे हडपसर, पुणे येथील रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्या मालकीच्या दोन्ही स्वतंत्र प्लॉटचा नोंदणी व्यवहार करताना तोतयाने आगरकर यांचे बनावट आधार कार्ड त्याला जोडले. त्या आधार कार्डवर पंकज आगरकर (रा. चैतन्यवाडी, बुलडाणा) असे नमूद आहे. त्यापुढे जाऊन याप्रकरणात आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाल्याचेही नमूद आहे. त्यामुळे या कटात बोगस आधार कार्ड बनविणाऱ्यांसह साक्षीदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी असल्याचा आरोप पंकज आगरकर यांनी केला आहे. त्या आधार कार्डवरील केवळ नाव वगळले तर त्यावरील फोटो देखील आगरकर यांचा नाही.