अमरावती: पोलीस असल्याची बतावणी करून येथील एकाला तब्बल १.२२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे हातचलाखीने लांबविण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ च्या सुमारास नागपूर हायवेवरील निर्माणाधिन उड्डाणपुलाजवळील पहेलवान बाबा हनुमान मंदिरानजिक ही घटना घडली. याप्रकरणी प्रकाश सुकलेकर (रा. अर्जुननगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी दुचाकीहून आलेल्या दोन अनोळखी तरूणांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
प्रकाश सुकलेकर हे शनिवारी सकाळी नागपूर रोडने मॉर्निंग वॉक करत असताना पहेलवान बाबा हनुमान मंदिरानजिक दोन आरोपी दुचाकीने त्यांच्याजवळ आले. काका सोन्याच्या अंगठ्या काढा, सोने घालुन फिरु नका, मी पोलीस आहे, असे म्हणून दोघांनीही त्यांना आय कार्ड दाखवले. मात्र सुकलेकर यांनी ते बरोबर पाहिले नाही. सुकलेकर यांनी स्वत:कडील तीन अंगठ्या, गोफ व लॉकेट असे सुमारे ४१ ग्रॅम सोन्याच्या वस्तू काढल्या. ते सोने आमच्याकडे द्या, रुमालात बांधून देतो, अशी बतावणी त्या दोघांनी केली. त्यामुळे सुकलेकर यांनी ते सोने आरोपींकडे असलेल्या रूमालात ठेवण्यास दिले. आरोपींनी तो रूमाल त्यांना परत दिले. मात्र फिर्यादींनी रूमालात सोने पाहिले असता ते दिसले नाही. तेवढ्या वेळात दोन्ही आरोपी पळून गेले.
आरोपी २५ व चाळीशीतील दुचाकीहून आलेल्या त्या दोघांपैकी एकजण २५ तर दुसरा ४० वर्षे वयोगटातील असल्याची तक्रार प्रकाश सुकलेकर यांनी नोंदविली. त्यांनी लागलीच घटनेची माहिती पोलिसांना दिली. ती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तथा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीची देखील पाहणी केली. मात्र आरोपींचा मागमूस लागला नाही.