सोमवारी ठरणार दिशा : साफसफाई देयकांमधील अनियमितता अमरावती : प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळलेल्या स्वास्थ्य अधीक्षकाच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी एफआयआर नोंदविण्यापूर्वी प्राथमिक आणि विभागीय चौकशी (डीई) केली जाणार आहे. त्यामुळे ‘एफआयआर’ दाखल करण्याच्या आदेशाला तुर्तास अर्धविराम मिळाला असून मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बडनेरामधील दोन प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. सुमारे १० लाख रूपयांची ही देयके होती. याप्रकरणी तिजारे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार नोंदवावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवार २३ जानेवारीला काढले होते. तिजारे यांनी अज्ञात किंवा संशयिताविरुद्ध ती तक्रार नोंदवायची होती. फौजदारी कारवाईमुळे ती बनावट स्वाक्षरी कुणाची, हे सिद्ध होण्यास मदत होणार होती. त्याचवेळी साफसफाई देयकामधील टक्केवारीच्या आरोपालाही बळ मिळण्याची शक्यताही होती. त्या अनुषंगाने अरूण तिजारे यांनी याप्रकरणी वकिलाचा सल्ला घेत तुर्तास फौजदारी करण्यापूर्वी चौकशी करण्याची सूचना नोटशिटमधून केली. एफआयआर ऐवजी चौकशीचा सुलभ मार्ग निवडण्यात आला. याप्रकरणाच्या चौकशीवर सोमवारी पहिल्या सत्रात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महिन्याकाठी लाखोंचा खर्च ४महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत .कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ्य निरीक्षकांकडून देयकांबाबत अहवाल सादर केला जातो. विविधस्तरावर तपासणी केल्यानंतर देयके अदा केली जातात. दैनंदिन साफसफाईवर महापालिकेच्यावतीने महिन्याकाठी सुमारे ८५ ते ९५ लाख रुपये खर्च केले जातात. असे होते प्रकरण ४बडनेरातील प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथिल बहिरमबाबा संस्थान आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवार बाजार येथिल मरिमाता बचतगट, बडनेरा यासंस्थेची माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांची चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. यादेयकावर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारेंची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती.
बनावट स्वाक्षरी, एफआयआरला ‘ब्रेक’
By admin | Published: January 29, 2017 12:27 AM