(फोटो)
अमरावती : शहरासह ग्रामीण भागात रविवारी दुपारी वादळासह पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामध्ये जिल्ह्यात ३२० घरांची पडझड झाली, तर ९१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषिसहायक व तलाठी यांनी नुकसानाचा प्राथमिक अहवाल सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.
जिल्ह्यात रविवारी दुपारी १ च्या सुमारास जोराच्या वाऱ्यासह पावसाने सुमारे अर्धा तास अमरावती शहरासह वरूड, अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. यामध्ये शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. यामध्ये दोन कार व दुचाकी दबल्या. याशिवाय ग्रामीणमधील अमरावती तालुक्यात दोन, वरूड तालुक्यात चार, अंजनगाव सुर्जी तालुक्यात दोन व अचलपूर तालुक्यात सात अशा एकूण १५ गावांमध्ये नुकसान झाले. सर्वाधिक २९४ घरांची पडझड वरूड तालुक्यात झाली. याशिवाय अमरावती तालुक्यात सात, दर्यापूर चार, अंजनगाव सुर्जी दोन, चांदूर बाजार तालुक्यात ११ व चिखलदरा तालुक्यात दोन घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
बॉक्स
संत्रा, केळी, कांद्याचे नुकसान
अमरावती तालुक्यात ६० आर, अंजनगाव तालुक्यात ३० हेक्टर, अचलपूर तालुक्यात १२ हेक्टर अशा ४२.६० हेक्टरमधील केळी, वरूड तालुक्यात ३२ हेक्टरमधील संत्रा व अचलपूर तालुक्यात १७ हेक्टरमधील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.