अमरावती : ९८ लाखांच्या फसवणूक प्रकरणात लेखा परीक्षकाने खोटे पत्ते देऊन अमरावती पोलिसांची दिशाभूल केली. यादव पंढरी निखारे (४९,रा. रामकृष्ण सोसायटी, नरेंद्रनगर, नागपूर) या आरोपीने नागपुरात दाखविलेल्या पत्त्यांवर अमरावती पोलीस गेले असता ते पत्तेच खोटे आढळून आले. या प्रकरणात आरोपी यादवला १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बनावट दस्तऐवजांद्वारे ९८ लाखांचे कर्ज मंजूर करून वरिष्ठांकडे सकारात्मक अहवाल पाठविणाºया इर्विन चौकातील आंध्रा बँकेचे तत्कालीन मॅनेजर यादव निखारेला अमरावती पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. यादव निखारे हे सद्यस्थितीत मुंबई येथील आंध्रा बँकेत ऑडिटरपदावर कार्यरत होते. या प्रकरणातील आरोपी आकाश शिरभातेने चिंतामणी प्रिटिंग पे्रसची स्थापना करण्यासाठी लागणाºया मशीनच्या खरेदीसाठी ९८ लाखांचे कर्ज उचलले होते. त्यावेळी त्याने नागपूर येथील पत्ते दिले होते. त्या पत्त्याचे निरीक्षण केल्याचा दावा निखारे यांनी केला होता.
त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक शनिवारी निखारेला घेऊन नागपूरला गेले. त्यावेळी निखारेने दिलेले पत्ते खोटे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकरणात कर्ज उचलतेवेळी निखारेने आठ लाखांची रोख घेतल्याची माहिती आरोपी आकाश शिरभातेने पोलिसांना दिली होती. निखारेला घेऊन रात्री उशिरा अमरावती पोलीस परतले. पुढील चौकशी पोलीस करीत आहे..