लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत आसेगाव ठाण्यात तक्रार दिली होती.विधानसभा निवडणुकीदरम्यान २७ सप्टेंबर २०१४ रोजी ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या शपथपत्रातील फॉर्म २६ मध्ये नमूद केलेल्या संपत्तीच्या तपशिलात १९ एप्रिल २०११ रोजी मुंबई गृहनिर्माण सहकारी संस्थेने मंजूर केलेल्या इमारत क्र. २ मधील २-सी गाळा क्रमांक ३०२ या सदनिकेची ४२ लाख ४६ हजारांच्या संपत्ती खरेदी केल्याची माहिती नाही. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या कुर्ला येथील महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या शाखेतून १ फेब्रुवारी २०१० रोजी कर्ज घेतले होते. या गृहकर्जाचा उल्लेख त्यांनी निवडणूक अर्जात केला. संपत्ती कमी व कर्ज जास्त दाखवून निवडणूक आयोगाची व जनतेची दिशाभूल केल्याची तक्रार २८ डिसेंबर २०१७ रोजी चांदूरबाजार नगर परिषदेचे तत्कालीन बांधकाम व शिक्षण सभापती गोपाल तिरमारे यांनी केली होती.यावरून पोलिसांनी बच्चू कडूंवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२५ अ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या पुढील तपासाची परवानगी चांदूरबाजारचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी दिली. याची शहानिशा केल्यावर बच्चू कडू यांची मुंबईत सदनिका असल्याचे व सोबतच घेतलेले गृहकर्ज फेडल्याचे व कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र ०५ जून २०१७ रोजी बँकेने दिल्याचे निष्पन्न झाले. बच्चू कडू यांनी सादर केलेल्या नामनिर्देशपत्रात सदनिके चा उल्लेख केला नाही. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असल्याचा व माहिती लपविल्यास तो अपराध होतो, अशी माहिती अचलपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांनी १० जानेवारी २०१८ रोजी आसेगाव पोलिसांना दिली. तथापि, आमदार कडू यांनी आसेगाव पोलिसांच्या तपासणीदरम्यान दिलेल्या पत्रामध्ये सदर सदनिका त्यांच्या मालकीची नसल्याचे कुठेही नाकारले नाही.त्यांचे हे कृत्य निवडून येण्यासाठी हेतुपुरस्सर लपविल्याचे व खोटे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम ३३ (अ) चा भंग असल्याचे कृत्य या कायद्याचे कलम १२५ (अ) नुसार अपराध होत असल्याने दोषारोपपत्र आसेगावचे ठाणेदार अजय आकरे यांनी चांदूर बाजारचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष दाखल केले. यासंदर्भात आमदार कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयात सादर केले आहे. त्यानुसार, न्यायालयाने समन्स बजावला आहे.- अजय आकरे,ठाणेदार, आसेगाव पोलीस ठाणे
उमेदवारी अर्जात खोटी माहिती, अचलपूरचे आमदार बच्चू कडूंवर दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 7:50 PM
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी चांदूरबाजार येथील प्रथमश्रेणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना १६ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यास बजावण्यात आले आहे. चांदूर बाजारचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत आसेगाव ठाण्यात तक्रार दिली होती.
ठळक मुद्देप्रथमश्रेणी न्यायालयाचा समन्स : १६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश