राष्ट्रीय लोकअदालत : १४ प्रकरणांचा तडजोडीने निपटारालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भांडणापेक्षा समझोता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा, असा संदेश देत कौटुंबिक न्यायालयाने नऊ जोडप्यांचे संसार फुलविण्यात यश मिळविले. शनिवारी कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १४ प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यात आले असून त्यापैकी ९ कुटुंबीयांचे संसार जुळविण्यात कौटुंबिक न्यायालयाला यश मिळाले आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २६ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी ९ जोडप्यांनी एकत्र संसाराच्या मार्गावर पाऊल टाकले. यामध्ये दोन प्रकरणे घटस्फोटासाठी दाखल केलेले होते. कौटुंबिक न्यायालयाच्या पुढाकाराने घटस्फोट टाळून संबंधित पक्षकारांनी एकत्र संसार थाटण्याचा निर्णय घेतला. उर्वरित पाच प्रकरणांमध्ये महिला पक्षकारांना आपसी सहमतीने पोटगी मंजूर केली आहे. या लोकअदालतीत दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.बी.राठोड, लोकअदालत पॅनलमधील वकील भारती सावरकर आणि अमित सहारकर यांनी सदस्य म्हणून कामकाज पाहिले. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. न्यायाधीश इंद्रकला नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली कौटुंबिक न्यायालयाच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयाचे कोर्ट व्यवस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी दिली.
कौटुंबिक न्यायालयाने फुलविले नऊ संसार
By admin | Published: July 09, 2017 12:13 AM