बडनेरा (अमरावती) : धावत्या रेल्वे गाडीच्या चालकास व सहायकास त्यांच्या कुटुंबांचा अति महत्त्वाचा संदेश तत्काळ मिळावा, असा आदेश मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा यांनी शुक्रवारी (२८ डिसेंबर) बडने-यातील पाहणी दौ-यात दिला. त्याचप्रमाणे त्यांनी जीएम स्पेशल ट्रेनने हायस्पीडची ट्रायलदेखील घेतली. पाहणी दौ-यासाठी महाप्रबंधक डी.के. शर्मा हे बडने-यात आले होते. दरम्यान, कर्मचा-यांच्या महिलांनी त्यांची भेट घेतली. आमचा अति महत्त्वाचा संदेश तत्काळ पोहचावा, अशी व्यवस्था करावी, अशी व्यथा त्यांनी मांडली. त्यावर महाप्रबंधकांनी धावत्या रेल्वे गाडीच्या चालकास व सहायकास कुटुंबाचा संदेश तत्काळ पोहोचल्या जाईल तसा आदेश देखील देण्यात आला.
धावत्या रेल्वेत हजारो प्रवाशांची वाहतूक करताना चालक व सहायकाचा मोबाईल बंद ठेवणे हा रेल्वे प्रसासनाचा नियमच आहे. कारण मोबाईलमध्ये व्यस्त असताना चालकाचे मन विचलीत होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी कुटुंबाचा महत्त्वाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत असे तो संदेश लॉबीमार्फत कंट्रोल रूमला जाईल. खरोखरच संदेश महत्त्वाचा असेल तर तो स्टेशन मास्तरमार्फत वॉकीटॉकीद्वारे इंजीनमधील वॉकीटॉकीवर दिला जाणार आहे. त्यानंतर त्या गाडीच्या चालकास किंवा सहायक चालकास घरी जाण्यासाठी सुट्टीदेखील दिली जाणार असल्याचे महाप्रबंधकांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जीएम स्पेशल ट्रेनच्या १४ डब्याच्या गाडीने परतीच्या प्रवासात तासी वेग १२५ किलोमिटरची चाचणीदेखील घेतली.
गाडीची स्पिड वाढवता येईल का हे तपासण्यात आले. बडनेरा ते मूर्तिजापूर स्टेशनपर्यंत ही चाचणी घेण्यात आली. सध्या तासी वेग ११० किलोमीटरने रेल्वे धावतात. या चाचणीमध्ये भविष्यात प्रवासी रेल्वे गाड्यांची स्पिड वाढू शकते व लांब पल्ल्याचे अंतर वेळेचे संधान साधून कमी होऊ शकते. यावर मात्र, महाप्रबंधकांनी ट्रायल घेतली आहे. त्यावर कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही. या पाहणी दौ-यात महाप्रबंधकांसोबत डीआरएम रामकरण यादव रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.के. जैन, मुख्य परिचालन प्रबंधक डी.के. सिंग, वरिष्ठ परिचालन मंडळ प्रबंधक स्वप्निल निळा, मुख्य अभियंता सुशील वावरे, पीसीएससी (आयजी) ए.के. श्रीवास्तव, मंडल सुरक्षा आयुक्त भुसावळ ए.के. दुबे यांच्यासह इतरही भुसावळ व मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांचा ताफा होता.