- चेतन घोगरेअमरावती - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी असलेली शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आता उसनवारीची शक्कल लढविली आहे. शौचालय नाही म्हणून नामांकन रिजेक्ट होऊ नये, यासाठी तालुक्यातील अनेक जण चक्क शेजा-यांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवित आहेत.निवडणुकीपुरता सुरू असलेला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार का तसेच हे अर्ज छाननीच्या दिवशी घेतल्या जाणाºया आक्षेप, हरकतींवरून स्पष्ट होणार आहे. शासनाने घातलेल्या टॉयलेटच्या अटीमुळे उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आल्याचे चित्र आहे. तालुक्यात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे यापदासाठी इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे.सरपंचपदासाठी उमेदवारांची संख्या वाढल्यास तेवढीच पॅनलचीही संख्या दिसून येणार आहे. एका-एका गावांत तीन ते चार सरपंचपदाचे दावेदार दिसून येत आहेत. मात्र, त्यांना सदस्यपदासाठी उमेदवार मिळविणे फारच कठीण झाले आहे. सरपंच मतदानासाठी सदस्यपदाच्या उमेदवारांची मदत होणार असल्याने खर्चासह सर्वच जबाबदारी घेऊन सदस्यपदाचे उमेदवार ओढून ताणून पॅनलमध्ये घेतले जात आहेत. त्यापैकी ब-याच जणांकडे (उमेदवाराकडे) शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदोपत्री सुमारे १८ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्यपदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवारांकडे शौचालय नाही, अशांनी शेजा-यांकडे असणा-या शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र तयार करून ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजा-याचे शौचालय वापरत असेल तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल तर ते योग्य ठरणार का, हे अर्ज छाननीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.शौचालयाच्या उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का घातली गेली, हा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय असणेच अनिवार्य आहे किंवा शेजा-यांचे करारपत्र चालेल, याबाबतची भूमिका प्रशासनालाही तातडीने जाहीर करावी लागणार आहे. तरच हा प्रकार थांबणार आहे.करारपत्रावर हरकतीशी शक्यता निवडणूक लढविण्यासाठी शौचालय नसणाºया इच्छुक उमेदवारांचा शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे भासविण्याचा करारपत्राद्वारे प्रयत्न सुरू आहे. छानानीच्या दिवशी त्यावर विरोधी गटाकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हरकत घेतल्यास अधिका-यांना त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणुकीनंतरही हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी चिंचोली बु. या गावात सर्वाधिक मतदार आहे. यामध्ये ९४५ पुरुष, ९२० महिला एकूण १८६५ तर खिरगव्हाण यागावामध्ये सर्वात कमी मतदार आहेत. त्यामध्ये २४४ पुरूष, २२२ महिला एकूण ४६६ मतदार मतदान करणार आहे.सद्यस्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. छाननीनंतर निवडणूक आयोेगाच्या निकषात न बसणारे अर्ज रद्द केले जातील.पुरुषोत्तम भुसारी,तहसीलदार, अंजनगाव सुर्जी
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून भाडोत्री टॉयलेटचा फंडा, करारपत्रकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 4:24 PM