गजानन मोहोड अमरावतीचांदूररेल्वे तालुक्यातील कोहळा (खानापूर) अवघ्या ४०० लोकसंख्येचे गाव, अभावानेच असणारे सिंचन, परंतु शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत चार शेततळे तयार करण्यात आलेत. पुरामुळे विहीर बुजल्यानंतर सिंचन कसे करावे? या चिंतेत असणाऱ्या प्रकाश रामसिंग सोळंके या तरुण शेतकऱ्याला शेततळ्याने संजीवनी मिळाली. एकाच शेततळ्यावर ८ एकर हरभरा व ३ एकरात गहू पीक डौलाने उभा आहे. जिद्द न सोडता, हार न मानता, सोळंके यांनी जिरायती शेतात ११ एकरांत तुषार सिंचन केले. अत्यंत कमी पाण्यात व कमी पैशात किमान चार लाखांचे उत्पन्न रबी हंगामातून मिळण्याची अपेक्षा सोळंके यांनी व्यक्त केली आहे. चांदूररेल्वे तालुक्याच्या टोकावर असलेले कोहळा (खानापूर) गाव येथे मूलस्थानी जलसंधारणाचे कामे नाहीत. त्यामुळे जमिनीतदेखील पाण्याची पातळी कमी. त्यामुळे या गावाची चांदूररेल्वे कृषी अधिकारी कार्यालयाने कोरडवाहू शेती अभियान या कार्यक्रमात निवड करण्यात आली. गावात १९ शेतकरी गट स्थापन करण्यात आले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात चार शेततळे तयार करण्यात आले. यापैकी एक प्रताप सोळंके यांच्या शेतात ३० बाय ३० मीटर लांबी व रुंदीचे शेततळे २०१३-१४ मध्ये खोदण्यात आले. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु जे काही पाणी शेतामधून वाहून निघाले ते शेततळ्यात जमा झाले व शेततळ्याच्या पाण्यावर निर्भर राहून सोळंके यांनी ८ एकर हरभरा व ३ एकरात गव्हाची पेरणी केली. आवश्यकतेनुसार स्प्रिंक्लरने पाणी दिले. आज हे पीक उत्तमरीत्या बहरले आहे. हरभरा फुलोऱ्यावर आहे. किमान एकरी १० ते १२ क्विंटल असे ८० ते ९० क्विंटल उत्पन्न होईल, अशी आशा आहे. गहूदेखील ओंबीवर असून १० ते १२ पोते एकरी उत्पन्न होईल, अशी आशा सोळंके यांनी व्यक्त केली. सिंचनाची वानवा असताना उमेद न हारता सोळंके यांनी कृषी विभागाच्या योजनेचा आधार घेऊन हिरवे स्वप्न फुलविले.
शेततळ्याने फुलविले हिरवे स्वप्न
By admin | Published: January 31, 2015 12:58 AM