वनोजा बाग (अमरावती) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेगाव शिवारात २५ जून रोजी ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. विवेक ऊर्फ बालू रामराव मानकर असे मृताचे नाव आहे.
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून २४ जूनच्या मध्यरात्री स्वतःच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याची माहिती पोलीस पाटील वैशाली अमोल शेळके यांना मिळताच त्यांनी रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे यांना माहिती दिली. सातेगाव बिट जमदार दुधराम चव्हाण यांनी सैनिक संतोष चऱ्हाटे व प्रशांत तायडे यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात रहिमापूर करीत आहेत.