चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील वणी येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. संजय जनार्दन राऊत (४५) असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच ते घरातून बेपत्ता होते. यामुळे घरातील सदस्य व नागरिकांनी संजय राऊत यांना सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर रात्री त्यांच्या शेतालगतच्या बाळू कोठाळे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. मात्र अंधारात मृतदेह काढण्यासाठी अडचण होत असल्याने शनिवारी सकाळी मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. संजय राऊत यांच्याकडे केवळ ३ एकर शेती असून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सततची नापिकी, तसेच वाढत्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. शनिवारी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. राऊत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा आप्तपरिवार आहे.
---------