अंजनगाव सुर्जी (अमरावती) : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्या पाठोपाठ पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी तालुक्यात उघड झाली.अशोक पांडुरंग भुयार (५५, रा.धनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चिठ्ठीत काय?मृत अशोक भुयार यांनी त्यांच्या शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. मात्र, व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता, पावतीवर जबरदस्तीने सही घेतली, मारहाणही केली. तक्रार देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबरला गेले असता, तेथे बीट जमादार व ठाणेदाराने बेदम मारहाण केली, असे अशोक भुयार यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.