अमरावती, दि. 16- कर्जमाफी होईस्तोवर अडचणीतील शेतक-यांना तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज शासन हमीवर देण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. मात्र तब्बल २४ दिवस शासन हमी बँकांना देण्यातच आली नसल्याने बँकांनी कर्जवाटपास ठेंगा दाखविला आहे. राज्यात पात्र ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच ४२ कोटी ९६ लाखांचे तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्यात आल्याचे वास्तव आहे.
अडचणीतील शेतक-यांना यंदाच्या खरिपासाठी अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासनाच्या हमीवर थकबाकीदार शेतक-यांना स्वयंघोषित शपथपत्र घेऊन तातडीच्या स्वरूपात १० हजारांचे कर्ज देण्याचे आदेश राज्य शासनाने १४ जूनला दिलेत. यातील काही निकषामध्ये सुधारणा करीत सुधारित आदेश २० जुनला दिलेत. मात्र राज्य शासनाची हमीच नसल्यामुळे एसएलबीसीव्दारा बँकांना निर्देशच देण्यात आलेले नव्हते.
विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणवणा-या जिल्हा बँकांनीदेखील शेतक-यांना १० हजारांचे कर्ज दिलेले नव्हते. अखेर एसएलबीसीने राष्ट्रीयीकृत बँकांना १० हजार रूपयांच्या कर्जाचे निर्देश दिलेत. मात्र बँकांनी गंभीरतेने न घेतल्यामुळे शेतक-यांना अडचणीच्या काळात कर्जवाटप झालेले नाही. हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचा आरोप शहर, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
राज्यात ३० जुनअखेर ३८ लाख ९७ हजार ११९ शेतकरी खातेदार आहेत. मात्र बँकांव्दारा सहकार्य होत नसल्याने ६३ हजार २३ शेतकरी खातेदारांनी बँकांकडे अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६१ हजार ५४८ शेतकºयांचे ३० ऑगस्टअखेर अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात बँकांनी ५२ हजार ९६९ शेतकºयांना ५२ कोटी ७७ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहेत.
जिल्हानिहाय झालेले कर्जवाटपठाणे जिल्ह्यात ९४८,पालघर ४३०, रायगड ८५८, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी १२८, नाशिक ३४१, धुळे १९०, नंदूरबार ८२, तळेगाव ६४, अहमदनगर ५,४७६, पूणे २४९, सोलापूर ७५१, कोल्हापूर २८३. सांगली ५१६, सातारा १२६, औरंगाबाद १,९६९, जालना ३,४८१, परभणी २०,५६७, हिंगोली ३,२५६, बीड १,५२८, नांदेड ९८४, उस्मानाबद ९१६, लातूर १३७, बुलडाणा १,५०४, अकोला २८२, वाशिम ३४७, अमरावती २,२२३, यवतमाळ १,८०८, वर्धा १,२९३, नागपूर ७९२, भंडारा २१२, चंद्रपूर ६२२, गडचिरोली ३२६, गोंदिया ३०५, असे एकूण ५२ हजार ९६१ शेतक-यांनाच कर्जवाटप करण्यात आलेले आहेत.