मोर्शी (अमरावती) : शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोराळा पिंगळाई येथे गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडलेल्या शेतकऱ्याला भिक्षेकरी (फकीर) यांनी ११ लाख रुपयांना गंडविले. शेतकऱ्याने स्वत:चे शेत विकून ही रक्कम उभारली होती. घरातील गुप्तधन शेतात वळवून ते काढून देण्याच्या भूलथापा या फकिरांनी दिल्या होत्या. याप्रकरणी शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणूक व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दादाराव नामदेव गणवीर असे गंडा घातला गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गौराळा येथे आलेल्या फकिराने गणवीर यांचे घर गाठले. त्याने स्वत:चे नाव रियाज शाह असे सांगितले. तुमच्या घरात गुप्तधन आहे. ते बाहेर न काढल्यास तुमचा मुलगा मरू शकतो, अशी बतावणी या फकिराने केली. यानंतर, अल्ताफ शेख, अब्दुल शाह व आणखी दोन साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्या सर्वांनी गुप्तधन काढण्यासाठी सामग्री आणावी लागेल, असे म्हणत पैसे घेतले. दुसऱ्या दिवसापासून गणवीर यांना फकिरांनी दिलेले सर्व क्रमांक स्विच ऑफ होते. फसविले गेल्याची जाणीव होताच गणवीर यांनी २९ जून रोजी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
म्हणे, घरातील गुप्तधन शेतात वळवतो
९ जूनला आम्ही गुप्तधन काढून देऊ. ते घरातून तुमच्या शेतात वळवतो, असे म्हणून हे टोळके निघून गेले. त्यानंतर तीन-चार दिवसांनी फकीर गणवीर कुटुंबीयांना शेतात घेऊन गेले. खोदलेल्या ठिकाणी छोट्या मूर्ती निघाल्या व दोन ग्रॅम सोन्याचे लॉकेट निघाले. ते अस्सल असल्याने आता पती-पत्नीने ११ लाखांसाठी शेत विक्रीला काढले. दुसरीकडे शेत विकत घ्यायचे असल्याचे सांगून ते १२ लाख ९३ हजारात ते शेजाऱ्याला विकले. त्यानंतर त्यांनी फकिरांशी फोनवर संपर्क केला. तथापि, आम्ही येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी गणवीर यांच्याकडे दुचाकीस्वार पाठविला. त्याच्यासोबत ते वरूडला आले व ११ लाख स्वाधीन केले.
पत्नीचे मंगळसूत्र मोडले
दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास पाच व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यांच्यापैकी गुरूने पुजेला सुरुवात केली. तुमच्या घरात सोन्याने भरलेले तीन हंडे आहेत. ते काढण्याकरिता ११ लाख रुपये खर्च येईल, असे या कथित गुरूने सांगितले आणि ११ लाख १४ हजार रुपये घेऊन सर्वजण निघून गेले. ही रक्कम मंगळसूत्र मोडून उभारली.