बडनेरा : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंभोरा लाहे याठिकाणच्या ५५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गाईच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन करून सोमवार १३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. भास्कर सुखदेव ढोरे (५५, रा. निंभोरा लाहे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या सुमारास घराला लागूनच असणाऱ्या गाईच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन करून भास्कर ढोरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या नावाने पाऊण ऐकर शेत आहे. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता. अवकाळी पावसामुळे शेतात पेरलेला कांदा व गव्हाचे नुकसान झाल्याचे त्यांच्या कुटुंबांनी प्रतिनिधीला सांगितले. त्याचप्रमाणे त्यांच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे ६० हजार रूपयाचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी आहे. बडनेरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सततच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याही वाढल्या आहेत. अवकाळी पावसाने हातचे पीक गेल्याने हैराण शेतकरी जीवन संपविण्याचा निर्णय घेत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने भरभक्कम आधार देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
निंभोरा लाहे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: April 14, 2015 12:34 AM