नांदगाव खंडेश्वर : कृषी विभागामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रम सन २०२०-२१ शेतकरी प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील नांदुरा खुर्द या गावात करण्यात आले होते.
मातीपरीक्षण व त्याचे महत्त्व, त्यानुसार खताचा वापर, जमिनीचे आरोग्य व सुपीकता राखण्यासाठी खतांच्या समतोल वापराचे महत्त्व, माती नमुना कसा काढावा तसेच हरभरा व गहू व्यवस्थापन याबाबत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील माजी मृदाशास्त्र विभागप्रमुख पी.डी. देशमुख यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
नांदुरा खुर्द येथे गुलाबराव उगले यांच्या शेतात अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सोयाबीन बियाणे जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक वैशाली वानखडे यांनी कपाशी फरदड निर्मूलनाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक व संचालन कृषिसहायक सुनील तेलखडे यांनी केले. याप्रसंगी गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.